04 July 2020

News Flash

दौलताबाद किल्ल्यावरील २७७ तोफांचे ‘तेजस’ अध्ययन!

मोठय़ा बुरुजावर अवजड तोफा कशा पोहोचल्या असतील? पानिपतच्या पहिल्या युद्धात वापरली गेलेली तोफ आणि नंतर तोफ बांधणीत होत गेलेले बदल, असा तोफांचा इतिहास उलगडत खुलताबाद

| May 29, 2014 01:45 am

मोठय़ा बुरुजावर अवजड तोफा कशा पोहोचल्या असतील? पानिपतच्या पहिल्या युद्धात वापरली गेलेली तोफ आणि नंतर तोफ बांधणीत होत गेलेले बदल, असा तोफांचा इतिहास उलगडत खुलताबाद येथील देवगिरी किल्ल्यावर २७७ तोफांचा अभ्यास औरंगाबाद पुरातत्त्व विभागाने पूर्ण केला आहे.
सहायक पुराविद् तेजस गग्रे यांनी केलेला अभ्यास कोणीही पाहिला की त्यांना मुलुखमदानी तोफ म्हणेल. तोफांवरील लिपी आणि मजकुराचाही त्यांनी अभ्यास केला आहे. त्यांच्याच प्रयत्नांमुळे खुलताबाद येथील २७७ तोफांच्या माहितीचा दस्तऐवजही तयार झाला आहे. शिवाय तोफांची माहिती पर्यटकांना व्हावी म्हणून खुले संग्रहालय करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
तोफांचा युद्धनीती म्हणून पहिल्यांदा वापर करणारा मोगल सम्राट बाबर होता. मात्र, तोफांच्या निर्मितीसाठी सर्वाधिक खजाना रिकामा करणारा राजा औरंगजेब होता. तोफांची निर्मिती आणि जडणघडण मात्र तुर्की कारागिरांच्या हातात अनेक काळ होती. उस्ताद रुमी असा त्यांचा उल्लेख इतिहासात आढळतो. तोफेत वापरला जाणाऱ्या दारुगोळय़ाचा शोध चीनमध्ये लागला. मात्र, त्याचा वापर खऱ्या अर्थाने तुर्कस्तानात अधिक नीट होऊ शकला, असा इतिहास गग्रे यांच्या तोंडावर असतो.
खुलताबाद येथील किल्ल्यात तीन प्रकारच्या तोफा आढळून आल्या आहेत. लोखंडी ओतीव तोफा, पंचधातूच्या ओतीव तोफा, मिश्र पद्धतीने बनविलेल्या बांगडी तोफा दिसून येतात. प्रत्येक तोफेवर त्यात किती दारूगोळा भरायचा, याचा तपशील असतो. काही तोफा कोणी तयार केल्या याचा उल्लेख असतो. काहींवर नक्षीकाम असते. तोफांचा मारा करण्यासाठी बुरुजांची पद्धतीही वेगळी असल्याचे गग्रे सांगतात. तोफांमध्ये भरायचा गोल आकाराचा दगड गुळगुळीत करणे ही मोठी किचकट प्रक्रिया होती. एका खाचेत हाताने दगड फिरविण्यास मोठे मनुष्यबळ लागे. प्रत्येक सम्राट तोफखाना सांभाळणाऱ्याकडे विशेष लक्ष देत. तोफेतून दारूगोळा उडविणाऱ्याला गोलंदाज म्हटले जाई. त्यांना तोफची असेही नाव होते. एकदा वात लावून तोफ धडाडली की, ती थंड करण्यासाठी पाणी मारावे लागे. त्यामुळे बुरूजावर पाणी साठवण्याची व्यवस्था करावी लागत असे.
नव्याने तोफेतून मारा करण्यासाठी तोफेच्या नळीत कापडाचे पेलते घातले जात. आतून तोफ स्वच्छ झाल्यानंतर दुसरा मारा, अशी व्यवस्था होती, अशा कितीतरी तोफांची माहिती गग्रे यांना पाठ आहे.
बहुतांशी तोफांमध्ये समोरच्या बाजूने दारूगोळा भरण्याची पद्धत आहे. लातूर जिल्ह्यातील औसा येथील किल्ल्यातील काही तोफांमध्ये मागच्या बाजूने दारू भरण्याची सोय असल्याचे आढळून आले आहे. मात्र, हे तंत्रज्ञान फारसे विकसित झाले नसावे, असे गग्रे यांचे मत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील देवगिरी किल्ल्यातील तोफांमुळे हा अभ्यास करणे शक्य झाल्याचे ते सांगतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2014 1:45 am

Web Title: study of tofa on daulatabad fort
टॅग Aurangabad,Study
Next Stories
1 ‘बेडूकउडी’ धोक्यात!
2 बनावट पदवीधारक तुपाशी, पात्र शिक्षक राहिले उपाशी!
3 भाजपप्रमाणे राष्ट्रवादीचा सोशल मीडियावर प्रचार
Just Now!
X