कल्पेश भोईर

करोनाच्या संकटामुळे मागील एक ते दीड महिन्यापासून शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण प्रणालीद्वारे धडे देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र असे जरी असले तरी वसई भागातील बहुतेक विद्यार्थ्यांजवळ इंटरनेट सुविधा आणि मोबाइल उपलब्ध नाही. या अडचणी दूर करण्यासाठी तालुका शिक्षण विभागाने पुढाकार घेतला असून लवकरच दूरचित्रवाणीच्या माध्यमातून शिक्षण सेवा सुरू केली जाणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी माधवी तांडेल यांनी दिली.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वसईतील शाळा बंद आहेत. त्यामुळे सध्या ऑनलाइन तासिका व शासनाकडून दूरचित्रवाणीवर दाखविल्या जाणाऱ्या ‘टिलिमिली’ या कार्यक्रमातून विद्यार्थी अभ्यासाचे धडे घेत आहेत. त्यातही काहींना अडचणी येत असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. वसईच्या भागात एक हजाराहून अधिक प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. यामध्ये मोठय़ा संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी तालुका शिक्षण विभागाने तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी दूरचित्रवाणीच्या आधारे तासिका सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे.

तालुक्यातील शाळांचे सर्वेक्षण केले, त्यावेळी इंटरनेट व मोबाइल सुविधा नसल्याने मुले ऑनलाइन शिक्षण घेऊ  शकत नाही. यासाठी आता तालुक्यातील शिक्षकांचे पथक तयार करून दूरचित्रवाणीवर विविध विषयांवर ५ वी ते १० वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना धडे दिले जाणार आहेत. त्यासाठी प्रत्येक इयत्तेच्या वेळेनुसार वेळापत्रक ठरवून दिले जाणार आहे. ही अभ्यास तासिका वसईत पाहिल्या जाणाऱ्या वाहिनी उपलब्ध करून दिली जाईल. याचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि इतर विद्यार्थ्यांना होईल, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला.

कोणत्या माध्यमातून किती विद्यार्थ्यांना शिक्षण?

माध्यम     विद्यार्थी

दूरचित्रवाणी १ लाख ५३ हजार ७७४

नभोवाणी   १ लाख ४९ हजार ३३८

संगणक १ लाख ७३ हजार ९२४

मोबाइल १ लाख ७० हजार ९४९

वसईतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी सर्व शिक्षकांना सोबत घेऊन तालुकास्तरावर  विद्यार्थ्यांना दूरचित्रवाणीद्वारे शिक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. लवकरच या योजनेचे काम पूर्ण करून शिक्षण सुरू होईल.

– माधवी तांडेल, गटशिक्षणाधिकारी, वसई