कुरखेडातील हत्याकांड

मंगेश राऊत, नागपूर</strong>

गडचिरोलीतील कुरखेडा उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) शैलेश काळे यांचा अतिउत्साह नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या १५ जवानांच्या जीवावर बेतला की काय, अशी चर्चा आता दबक्या आवाजात सुरू आहे.

नक्षलग्रस्त किंवा दहशतवादग्रस्त भागात कोणतीही कारवाई करताना त्याचे काही संकेत किंवा नियम ठरलेले असतात. ३० एप्रिलला दादापूरला नक्षलवाद्यांनी वाहने जाळल्यावर काळे हे दुचाकीने काही कर्मचाऱ्यांसह पुराडापर्यंत आले. त्यावेळी त्यांनी दादापूर परिसरात अभियान राबवण्याचे ठरवून शीघ्र कृतीदलाला बोलावून घेतले. पथक खासगी वाहनात बसले अन्, नक्षलवाद्यांच्या सापळ्यात अलगद अडकले. ३० एप्रिलच्या रात्री काळे पुराडा पोलीस मदत केंद्रात होते. उत्तर गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा हिंसाचार कमी असला तरी जिल्हा नक्षलग्रस्त आहे. जांभूळखेडापासून पुढे घनदाट जंगलही आहे. हिंसक घटनेनंतर कोणतीही हालचाल करताना पुरेशी सावधगिरी बाळगली नाही तर सापळ्यात अडकण्याची शक्यता असते. हाच प्रकार महाराष्ट्र दिनी झाला. तसेच गडचिरोलीत तातडीने मदत पाठवताना हेलिकॉप्टरचा वापर करण्याचा किंवा रस्त्याची सुरक्षा तपासण्याचा नियम आहे. मात्र, पथकाला पुराडा येथे बोलावताना याकडे दुर्लक्ष झाले की काय, अशी चर्चा आहे. काळे यांच्या अतिउत्साहामुळे जवानांना जीव गमवावा लागल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालक याची चौकशी करतील, असे उत्तर दिले.