14 December 2017

News Flash

..आपल्या कोंबडय़ा सांभाळा – सुभाष देसाई

राणे स्वार्थी आहेत. निलेश, नितेश यांच्या भविष्याचा विचार सोडून ते अन्य कोणाचे भले करणार

रत्नागिरी | Updated: October 8, 2017 3:38 AM

नारायण राणे , सुभाष देसाई

शिवसेनाप्रमुखांनी कोंबडी चोर म्हणून नाव ठेवलेले राणे तुमच्याकडे येत आहेत,  तेव्हा भाजपावाल्यांनो आपल्या कोंबडय़ा सांभाळा, अशी जहरी टिका करताना भाजपवाले राणेंना सडवून नव्हे, तर कुजवून  ठेवतील, असा टोला उद्योगमंत्री तथा शिवसेनेचे कोकण विभागीय संपर्क प्रमुख सुभाष देसाई यांनी मारला.

साळवी स्टॉप येथील स्वामी समर्थ हॉलमध्ये झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधी शिबीराप्रसंगी मार्गदर्शन करताना देसाई  यांनी   नारायण राणेंसह आमदार नितेश राणे आणि भाजपाला  टिकेचे लक्ष्य केले. ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी जे बीज रुजविले ते कोकणात आजही कायमस्वरुपी आहे. शिवसेनेची घौडदौड थांबविण्याची कोणामध्ये हिंमत नाही. दोन अरबी चड्डीवाले रत्नागिरीत आले आणि भाजपचे ७५ सरपंच निवडून येतील अशी वल्गना करुन गेले. आधी १० – २० सदस्य गोळा करा, नंतर सरपंच निवडून आणल्याचा दावा करा, अशी तंबी देसाई यांनी दिली. महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचा एनडीएतील सहभागाबाबत देसाई यांनी जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले, कोकणात गेले काही दिवस राजकीय घडामोडी घडत आहेत. काँग्रेसमध्ये डाळ शिजत नाही, म्हटल्यावर नारोबाने भाजपचा आश्रय घेतला आहे. ते करतानाही थेट पक्षात जायचे सोडून वाकडी वाट निवडली आहे. पक्ष स्थापन केला आणि त्याचे नाव महाराष्ट्र स्वाभिमान ठेवले. काँग्रेस सत्तेत टिकून राहील. असे वाटल्यानंतर राणेंनी शिवसेना सोडली. आता भाजप सत्तेवर टिकून राहणार हे लक्षात आल्यानंतर काँग्रसला सोडचिठ्ठी देऊन भाजपची वाट धरली आहे. ज्यांनी भाजपपुढे लोटांगण घातले, त्या पक्षाचे नाव स्वाभिमानी ठेवले आहे. निवडणूक आयोगानेही त्याचा अर्थ विचारला पाहिजे, अशी मिश्किल टिप्पणी देसाई यांनी केली.

राणे स्वार्थी आहेत. निलेश, नितेश यांच्या भविष्याचा विचार सोडून ते अन्य कोणाचे भले करणार नाहीत. हे आता सर्वानाच समजले आहे. शिवसेनाप्रमुखांनी  बाहेर काढले तेव्हा राणेंनी काँग्रेसमध्ये जायचा निर्णय घेतला. तेव्हा दहा आमदार त्यांच्या मागे गेले. त्यातील किती आमदार त्यांच्याबरोबर आहेत.

कोळंबकर वगळता अन्य कोणीही त्यांना साथ देणार नाहीत. कोळंबकर स्वतच्या कामामुळे त्या मतदारसंघातून निवडून येतो, त्यांना राणेंची गरज नाही. त्यामुळे स्वाभिमानी पक्षात कोण आमदार जाणार हा प्रश्नच आहे. आमदारकी जाईल म्हणून नितेश राणेही स्वाभिमान पक्षाच्या मेळाव्याकडे फिरकले नाहीत, अशी टिका देसाई यांनी केली.

First Published on October 8, 2017 3:38 am

Web Title: subhash desai criticized bjp for narayan rane