हवाई दलाच्या बेपत्ता विमानाला जलसमाधी मिळाली असावी अशी भीती व्यक्त करत केंदीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी विमानाचा ब्लॅकबॉक्स शोधण्यासाठी पाणबुडीचा वापर केला जात असल्याची माहिती येथे रविवारी माध्यमांना दिली.

विमानाशी ज्या ठिकाणी संपर्क तुटला त्या भागात समुद्राच्या पाण्याची खोली किमान साडेतीन किलोमीटर असल्यामुळे शोध मोहिमेत अनेक अडचणी येत आहेत. विमान शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचेही संरक्षण राज्यमंत्र्यांनी नमूद केले. काश्मीरप्रश्नी पाकिस्तानकडून होत असलेल्या कांगाव्यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. भामरे यांनी आम्ही आमच्या सीमा आणि काश्मीर सांभाळायला सक्षम असून पाकिस्तानने त्याबाबत संवेदना व्यक्त करण्याची गरज नाही असे ठणकावले.

..तिच्या कुटुंबीयांना अद्यापही चमत्काराची आशा

भारतीय वायूदलाचे एएन-३२ हे मालवाहू विमान बेपत्ता झाल्याच्या घटनेला तीन दिवस उलटल्यानंतर कुणी बचावले असल्याची आशा बहुतेकांनी सोडून दिली असली, तरी या विमानातील एका महिला वैमानिकाचे कुटुंबीय अद्यापही काही तरी चमत्कार घडण्याची आशा बाळगून आहेत.

चेन्नईहून पोर्ट ब्लेअरसाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळातच रडारवरून नाहीसे झालेल्या या विमानात फ्लाइट लेफ्टनंट दीपिका शिवरान याही होत्या. तिच्या वार्षिक सुटीचा काही काळ आमच्यासोबत घालवल्यानंतर ती पोर्ट ब्लेअरसाठी रवाना झाला होती, असे तिची आई प्रेमलता हिने सांगितले.

काही तरी चमत्कार घडेल आणि माझ्या मुलीसह इतर २८ बेपत्ता लोक सापडतील अशी मला आशा आहे, असे प्रेमलता म्हणाल्या. आपल्या मुलीशी गुरुवारी शेवटचे बोलल्याचे त्यांनी सांगितले.

संगणक अभियांत्रिकीची पदवीधर असलेली दीपिका शिवरान हिला नॉयडा येथे एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळाली होती आणि त्याच वेळी तिची लष्करातही निवड झाली होती. मात्र आणखी मोठी महत्त्वाकांक्षा बाळगून तिने २०१३ साली फ्लाइंग ऑफिसर म्हणून भारतीय वायूदलात प्रवेश घेतला होता. गेल्याच महिन्यात तिची नेमणूक पोर्ट ब्लेअरला झाली.

दीपिकाने गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात कुलदीप दलाल यांच्याशी विवाह केला. दलाल हे पोर्ट ब्लेअरलाच तटरक्षक दलात सहायक कमांडंट आहेत. या दोघांचे हे पहिलेच संयुक्त पोस्टिंग होते.