जिल्ह्य़ातील तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र विकास निधीतून सध्या २५ कोटी रुपयांची कामे सुरू आहेत, आगामी काळातही भरीव निधी दिला जाईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम व पर्यटन विकासमंत्री छगन भुजबळ यांनी आज श्रीक्षेत्र देवगड (ता. नेवासे) येथे बोलताना दिले.
श्रीक्षेत्र देवगड येथे महाराष्ट्र पर्यटन विकास विभागाच्या निधीतून उभारण्यात येणा-या १ कोटी ७३ लाख ११ हजार रुपये खर्चाच्या धर्मशाळा इमारतीचे व १ कोटी ९ लाख ५५ हजार रुपये खर्चाच्या रस्ता पार्किंग काँक्रिटीकरणाच्या कामाचे भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महंत भास्करगिरी महाराज होते. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, आमदार शंकरराव गडाख, माजी आमदार पांडुरंग अभंग आदी उपस्थित होते.
जिल्ह्य़ातील सरलाबेट, पेमगिरी, चौंडी, सिद्धटेक, चिंचोली, भगवानगड, राजूर येथील तीर्थक्षेत्र व पर्यंटन विकासासाठी २५ कोटी रुपये उपलब्ध करण्यात आले आहेत, श्रीक्षेत्र देवगडच्या विकासासाठीही ७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, पैकी ५ कोटी उपलब्ध करण्यात आले आहेत अशी माहिती देऊन भुजबळ यांनी सुशिक्षित व सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी महंत भास्करगिरी महाराजांकडून होत असलेल्या कार्याचा गौरव केला.
देवगड परिसरातील प्रवरा नदीवर पूल उभारण्याची मागणी भास्करगिरी महाराजांनी केली. नेवासे तालुक्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी अधिक निधी मिळावा, अशी मागणी आमदार गडाख यांनी केली. लंघे यांचेही या वेळी भाषण झाले. कार्यकारी अभियंता जे. डी. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. उपअभियंता सुरेश राजगुरू यांनी सूत्रसंचालन केले. सभापती कारभारी जावळे, अधीक्षक अभियंता हरीश पाटील आदी उपस्थित होते.