नांदेड व परभणी मतदारसंघांचा दौरा, तसेच मिळालेल्या माहितीच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची या दोन्ही ठिकाणी यशाबाबत खात्री झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या प्रचारार्थ पवार यांनी गुरुवारी येथे सभा घेतली. त्यानंतर परभणीची सभा करून ते नांदेडला आले. मागील काळात पवारांच्या मराठवाडय़ाच्या निवडणूक दौऱ्यात विनायक मेटे त्यांच्यासोबत असत. आता त्यांची जागा आमदार सतीश चव्हाण यांनी घेतली आहे. येथील मुक्कामात पवारांनी नांदेड मतदारसंघातील स्थितीचा विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेत चव्हाणच विजयी होतील, असा निष्कर्ष काढला. कार्यकर्त्यांनी आघाडीचा धर्म पाळण्याचा आदेश त्यांनी दिला.
पवार-चव्हाण भेट
दरम्यान, पवारांच्या नांदेड मुक्कामात चव्हाण यांनी त्यांची भेट घेतली. दोघा नेत्यांमध्ये बंद दालनात सुमारे अर्धा तास चर्चा झाली. पवार यांनी मुखेड मतदारसंघात अधिक लक्ष घालण्याची सूचना चव्हाण यांना दिल्याचे समजते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गंगाधर कुंटूरकर यांनी पवार यांनी प्रत्येकाशी स्वतंत्र चर्चा केली नाही, पण आघाडीचा धर्म पाळण्याबाबत ते आग्रही असल्याचे सांगितले. पवार चिखलीकरांच्या घरी आले तेव्हा कुंटूरकरही उपस्थित होते.
चव्हाण दिल्लीत हवेत- मुणगेकर
चव्हाणांच्या प्रचारार्थ काँग्रेसच्या आजीमाजी मंत्र्यांसह भालचंद्र मुणगेकर यांनीही वेगवेगळय़ा ठिकाणी सभा घेतल्या. चव्हाण यांनी मुखेड विधानसभा क्षेत्रात प्रचारार्थ दौरा केला. या मतदारसंघातील पेठवडज व अंबुलगा (तालुका कंधार) येथे सभांच्या माध्यमातून आमदार शंकरअण्णा धोंडगे व माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर एका व्यासपीठावर आले. यातून पवार यांच्या मंत्रानुसार आघाडीची एकजूट मतदारांसमोर गेली. दोन्ही सभांना मुणगेकर उपस्थित होते. चिखलीकर यांनी चव्हाण यांच्याशी असलेले मतभेद संपुष्टात आल्याचे जाहीर केले. शंकरअण्णा व प्रतापराव या दोघांना योग्य प्रकारे सांभाळून त्यांच्या प्रभावाचा वापर जिल्हय़ाच्या विकासासाठी केला जाईल, अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली. आमदार हणमंतराव बेटमोगरेकर, माधवराव पंडागळे, डॉ. श्याम तेलंग आदींची उपस्थिती होती. पेठवडज व कुरुळा या दोन्ही गटांमध्ये चव्हाण यांना मोठी आघाडी देण्याचा निर्धार सभेत करण्यात आला.