विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या परळी विधानसभा मतदार संघात पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय लढतीत, धनंजय मुंडे यांनी विजय मिळवत बीडच्या राजकारणात नवे पर्व सुरू केले. त्यानंतर आता बीडची जिल्हापरिषद देखील राष्ट्रवादीच्याच ताब्यात आणण्यात राष्ट्रवादीचे नेते व महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री आमदार धनंजय मुंडे यांना यश आले आहे.

या निकालावर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे म्हणाले की, आज नियतीने पुन्हा न्याय केला. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीची सत्ता जिल्हा परिषदेत प्रस्थापित होत आहे, हा विजय निश्चितच जिल्ह्याच्या विकासाला नवे बळ मिळवून देणार आहे. तर,या अगोदर काही वेळापूर्वीच भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी या जिल्हापरिषद निवडणुकीबाबत ट्विट करून निकालाचं चित्र स्पष्ट असल्याचे सांगत पराभव स्वीकारला होता.

“राज्यातील आघाडीचा परिणाम जिल्हा परिषदेत ही आहे रात्रीच बीड जिल्ह्यातील शिवसेनेने त्यांची इच्छा असतानाही बरोबर येण्याबद्दल असमर्थता दर्शवली ..लोकशाहीची प्रक्रिया म्हणून निवडणूक लढवत आहे बाकी निकाल स्पष्टच आहेत.” असं पंकजा मुंडे यांनी ट्विटद्वारे म्हटलं होतं.

यानंतर पार पडलेल्या बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवकन्या सिरसाट व उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे विजयी झाले. विधानसभेपाठोपाठ जिल्हा परिषदेतही पंकजा मुंडे यांना पराभावास सामोरे जावे लागल्याचे दिसत आहे.

आज पार पडलेल्या या निवडणुकीत महाविकासआघाडीला ३२ तर भाजपाला २१ मतं मिळाली. पाच जण अपात्र ठरले, उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे अधिकृत निकाल१३ जानेवारीपर्यंत राखीव ठेवण्यात येणार आहे.

आज नियतीने पुन्हा न्याय केला – 
अडीच वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बीड जिल्ह्याच्या जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात मतं देऊन जिल्हा परिषद आमच्या ताब्यात देण्याचे निश्चित केले होते. परंतु तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर करून अभद्र तोडाफोडी केली व जिल्हा परिषदेत सत्ता प्रस्थापित केली होती. न्यायव्यवस्थेत त्याविरुद्ध आम्ही यशस्वी लढाही दिला. आज नियतीने पुन्हा न्याय केला. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीची सत्ता जिल्हा परिषदेत प्रस्थापित होत आहे, हा विजय निश्चितच जिल्ह्याच्या विकासाला नवे बळ मिळवून देणार आहे. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष योगदान दिलेल्या जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व घटकांचे मनःपूर्वक आभार… अशी प्रतिक्रिया जिल्हापरिषद निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे.