News Flash

कर्णबधिर पायलच्या जिद्दीची कहाणी

कर्णबधिर झाल्यानंतरही तिनं अभ्यासाचा ध्यास सोडला नाही.  आणि जिद्दीच्या जोरावर ती इथंपर्यंत पोहोचली.

पायल पाटील

अलिबाग : जिद्द आणि चिकाटी असेल तर शारीरिक कमतरतेवर सहज मात करता येते. हे पायल पाटील हिने दाखवून दिले आहे, अलिबागजवळच्या ग्रामीण भागातील घोटवडे येथील पूर्णत: कर्णबधिर असलेल्या या गुणी विद्यार्थिनीने बारावीच्या कला शाखेतील परीक्षेत ८०.३० टक्के गुण मिळवून पीएनपी शैक्षणिक संस्थेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान पटकावला आहे.  दहावीच्या परीक्षेतसुद्धा ९० टक्के गुण मिळवून ती प्रथम आली होती.

अलिबागपासून जवळच असलेल्या घोटवडे या छोटय़ाशा खेडय़ात राहणारी पायल पाटील . लहानपणीच वडिलांचं छत्र हरपलं. आई शेतात काम करून घर चालवते त्यामुळे घरची परिस्थिती यथातथाच काकांच्या मदतीने तिने आपलं शिक्षण सुरूच ठेवलं . बेलोशी येथील लोकनेते दत्ता पाटील माध्यमिक शाळेत पायल सहावीत शिकत होती. त्यावेळी आणखी एक आघात झाला  तिला गालगुंडाचा आजार झाला आणि त्यात तिला पूर्ण बहिरेपणा आला.

उपचाराला पैसे नव्हते. तरीही जिद्दीने तिने शिक्षण सोडलं नाही . दत्ता पाटील शाळेत शिकताना तिने दहावीच्या परीक्षेत ९०.६० टक्के  गुण मिळवले होते .

पायलची आकलन शक्ती कमालीची होती. एक शब्दही ऐकायला येत नसतानाही ती शिक्षकांच्या ओठांच्या हालचालींवरून बरंचसं शिकली. अभ्यासाबरोबरच वक्तृत्व स्पर्धेतही ती अव्वल असायची.  कर्णबधिर झाल्यानंतरही तिनं अभ्यासाचा ध्यास सोडला नाही.  आणि जिद्दीच्या जोरावर ती इथंपर्यंत पोहोचली.

नियतीनं अगदी लहानपणापासूनच पायलची परीक्षा बघितली. आतापर्यंत या सगळ्या परीक्षांमध्ये पायल मोठय़ा हिमतीनं उत्तीर्ण झाली आहे. सतत हसतमुख असलेल्या पायलला आकाशात उंच भरारी घ्यायची आहे. पण त्यासाठी तिच्या पंखांना थोडंसं बळ हवं आहे .

पायलला कलेक्टर व्हायचंय

पायलला घरची परिस्थिती बदलायची आहे. त्यासाठी शिक्षण घेऊन कलेक्टर  व्हायचं स्वप्न तिनं उराशी बाळगलं आहे . मी अभ्यास नियोजनपूर्वक केला. त्यासाठी शिक्षकांचे खूप मार्गदर्शन लाभले, खूप सराव घेतला, असं ती सांगते.

पायलच्या कानावर कोचलर इन्लांन्टश सर्जरी ही शस्त्रक्रिया करायची होती.  त्यासाठी तिच्या कुटुंबाने शासनाकडे प्रयत्न केले. त्यातून ३ लाखांची मदत मिळाली. परंतु ती पुरेशी नव्हती. पायल १० वी उत्तीार्ण झाल्यानंतर प्रकाशात आली. त्यानंतर तिला मदतीचा ओघ सुरू झाला. त्यानंतर मुंबईतील केईएम रुग्णालयात तिच्यावर यशस्वी  शस्त्रक्रिया करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2019 3:13 am

Web Title: success story of alibaug deaf ear girl payal patil
Next Stories
1 सावित्रीबाईंचे जन्मगाव नायगावला पर्यटन स्थळाचा दर्जा
2 कोयना धरणातून होणारी वीजनिर्मिती पाण्याअभावी बंद
3 स्थलांतरित मजूर ते खासदार.. श्रुंगारे यांचा जिद्दीचा प्रवास
Just Now!
X