News Flash

म्युकरमायकोसिसच्या ८१ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

तपासणी व उपचार करण्यात आलेल्या रुग्णांपैकी ७२ रुग्णांना मधुमेह हा आजार होता

म्युकरमायकोसिसचे प्रतिकात्मक छायाचित्र

लातूर : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयामध्ये म्युकरमायकोसिस या आजाराच्या एकूण ४६२ रुग्णांची आजतागायत तपासणी करण्यात आली आहे. यात कान, नाक, घसा विभागात आजपर्यंत एकूण ४४४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी म्युकोरमायकोसिस या आजाराच्या १०० रुग्णांवर या रुग्णालयात उपचार करण्यात आले असून सद्याच्या स्थितीत ४६ रुग्ण कान, नाक, घसा विभागात दाखल आहेत. या आजाराची तपासणी केलेल्या रुग्णांपैकी ८१ रुग्णांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आल्या असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली.

तपासणी व उपचार करण्यात आलेल्या रुग्णांपैकी ७२ रुग्णांना मधुमेह हा आजार होता. ८२ रुग्णांना कोविड उपचारादरम्यान स्टेरॉइडचा वापर करण्यात आला होता व सात रुग्णांना इतर आजार होते. आजपर्यंत ५५ रुग्णांवर नाकाच्या श्वास घेण्याच्या ठिकाणच्या हवेच्या पोकळ्या काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच ४४ रुग्णांवर टाळूचा जबडा काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले. आजतागायत १८ रुग्णांच्या डोळ्यांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. सहा रुग्णांमध्ये बुरशीबाधित डोळा काढून टाकण्यात आला आहे. म्युकोरमायकोसिस या आजारावर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या इंजेक्शनचा रुग्णसंख्येच्या आवश्यकतेनुसार जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून नियमितपणे पुरवठा केला जातो. आजपर्यंत एकूण १३०६ इंजेक्शनचा वापर रुग्णांसाठी करण्यात आला असून सध्या रुग्णालयात  १६० इंजेक्शन उपलब्ध आहेत.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयामधील म्युकोरमायकोसिस लागण झालेल्य एकूण १२ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यापैकी नऊ रुग्णांचा मृत्यू हा पोस्ट कोविड गुंतागुंतीच्या आजारामुळे झाला असून तीन रुग्णांचा मेंदूमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती डॉ. देशमुख यांनी दिली.

काळ्या बुरशीची लक्षणे ही सामान्यत: नाक कोंडणे, डोळे लाल होणे, नजर कमी होणे, तीव्र डोकेदुखी, गालदुखी, दात हलू लागणे व टाळूला जखम होणे अशी आहेत. ही लक्षणे दिसून येताच रुग्णांना तत्काळ, कान, नाक, घसा विभागात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. सुधीर देशमुख, विभागप्रमुख डॉ. विनोद कंदाकुरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोषकुमार डोपे आदींनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2021 2:05 am

Web Title: successful surgery in 81 mucormycosis patients zws 70
Next Stories
1 शेतकरी भाऊ-बहिणीचा आत्मदहनाचा प्रयत्न
2 एटीएममधून पैसे चोरणाऱ्या टोळीला पकडण्यासाठी गोळीबार!
3 राष्ट्रवादीचा कार्यकर्ता व पुरवठादार योगेश मालपाणीला अटक
Just Now!
X