भारती हॉस्पिटलमध्ये उपचार

सांगली : वयाची शंभरी गाठलेल्या एका महिलेच्या खुब्यावर सांगलीतील भारती हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्राक्रियेनंतर महिलेची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती विभागीय मानद संचालक डॉ. हणमंतराव कदम यांनी गुरुवारी दिली.
पाय घसरून पडल्याने शंभर वर्षाच्या महिलेचा डावा खुबा निकामी झाला होता. वाढत्या वयामुळे महिलेवर उपचार करणे जोखमीचे होते. यामुळे या आजीबाईंना नातेवाईकांनी उपचारासाठी भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रुग्णालयातील तज्ज्ञांनी त्यांची तपासणी केली आणि शस्त्रक्रिया करायची तयारी दर्शवली. अस्थिविभाग प्रमुख ऑर्थोपेडीक डॉ. श्रीकांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुजय महाडीक यांनी भूलतज्ज्ञ डॉ. प्रशांत लोमटे यांच्या सहकार्याने ही शस्त्राक्रिया यशस्वीपणे पार पाडली.
साधारणपणे खुबा बदलाच्या शस्त्राक्रियेसाठी दीड तासांचा अवधी लागतो, परंतु रुग्णाचे वय लक्षात घेता ती शस्त्राक्रिया ४० मिनिटात पूर्ण केल्याचे डॉ. महाडिक यांनी सांगितले. शस्त्रक्रियेने नवीन खुबा बसवल्यानंतर त्या आजीबाई लगेच दुसऱ्या दिवशी चालू लागल्या. आता त्यांना कोणताही त्रास होत नसून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.
रुग्णालय अधिष्ठाता डॉ. शहाजी देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सारा धनवडे, उप अधिष्ठाता डॉ. सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्राक्रिया यशस्वी झाली.