१९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लखनऊच्या विशेष सीबीआय न्यायालयाने आज निकाल दिला. या निकालानंतर आता राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी सीबीआय न्यायालयाने दिलेल्या या निकालावर निशाणा साधला आहे. एवढी मोठी मशीद तोडण्यात आली आणि काहीच पुरावा नाही? असा प्रश्न त्यांनी केला आहे. तसेच, जर या देशाचा हा कायदा असेल तर मला वाटतं भविष्यात खूप अंधकार आहे. या देशात न्याय मिळण्याची आशा नाही, असेही त्यांनी बोलून दाखवलं आहे.

“बाबरी मशीद खटल्यात सीबीआय,एनआयएचा दुरूपयोग केला गेला आहे. सीबीआय देखील आता हिंदुत्वाचे हत्यार बनले आहे. तो दिवस दूर नाही जेव्हा साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहीत देखील निर्दोष ठरवले जातील. आता न्याय मतदारांच्या हातात आहे.” असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे.

“मी समजतो की आज पुन्हा या देशात काळा दिवस आहे. बाबरी मशीद १५२८ मध्ये बनवण्यात आली होती. १९४९ मध्ये जबरदस्ती त्यात मूर्ती ठेवण्यात आली. १९९२ मध्ये तिला पाडण्यात आले. संपूर्ण जगाने पाहिले. आपण म्हणतो आपण कायद्याचे पालन करतो. जेव्हापासून दिल्लीत मोदींचे सरकार आले आहे. सीबीआय, ईडी, आयटी, पोलीस या सर्वांना मोदी व अमित शाह यांनी खेळणं बनवून ठेवलं आहे. जेव्हा बाबरी मशीदीचा निकाल आला, तेव्हा न्यायाधीशांनी म्हटलं की, मशीद तुटली हे चुकीचं झालं. मशीदीत मूर्ती ठेवली हे चुकीचं झालं. एवढी मोठी मशीद तोडण्यात आली आणि काहीच पुरावा नाही. आता हेच होणार या देशात. साध्वीला सोडवण्यात आलं. बॉम्बस्फोटात त्यांचा सहभाग होता, त्यांना खासदार बनवण्यात आलं. पुरोहीतला सोडवण्यात आलं. मेजर उपाध्य सुटले. हेमंत करकरे यांनी जेवढे कष्ट घेतले होते. जे त्यांनी सर्व पुरावे गोळा केले होते. उद्या हे होईल की हेमंत करकरे बेईमान होते, त्यांनी चुकीचं केलं आणि एनआयए जे आज खेळणं बनलं आहे. एनआयएचा रिपोर्ट ग्राह्य धरला जाईल. जर या देशाचा हा कायदा असेल तर मला वाटतं भविष्यात खूप अंधकार आहे. या देशात न्याय मिळण्याची आशा नाही.” असं अबू आझमी यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटलं आहे.