मुख्यमंत्री आपल्या कुटुंबाला भेट देण्यास येणार, आपले सांत्वन करणार या आशेवर ताटकळत थांबलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची देवेंद्र फडणवीस यांनी घोर निराशा केली. गावाबाहेरच जलयुक्त शिवार प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन करून मुख्यमंत्र्यांनी काढता पाय घेतला. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे अश्रू पुसणे दूरच, पण त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार मुख्यमंत्र्यांनी केल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे संबंधित कुटुंबाच्या घरी मुख्यमंत्री येणार म्हणून जिल्हाधिकारी एस. पी. सिंह आधीच पोहोचले होते. मुख्यमंत्री या कुटुंबाच्या घरी भेट न देताच परस्पर गेले. या प्रकाराने प्रशासनही संभ्रमात पडले. सुरिपप्री गावी दोन महिन्यांपूर्वी आत्महत्या केलेल्या वसंत यमाजी बाबर यांच्या कुटुंबास भेट देण्यासाठी मुख्यमंत्री बुधवारी येणार होते. परभणीचा कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्र्यांचा सुरिपप्री येथे दौरा होता. मुख्यमंत्री भेट देणार असल्याने तेथे कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात केली होती.
मात्र, मुख्यमंत्र्यांनी गावाबाहेरील एका शेतात विहीर पुनर्भरण कार्यक्रमाचे भूमिपूजन केले आणि तेथूनच पुढील कार्यक्रमासाठी प्रयाण केले. तोपर्यंत जिल्हाधिकारी सिंह, उपविभागीय अधिकारी सुभाष िशदे आदी अधिकाऱ्यांनीच या कुटुंबाची विचारपूस केली. मुख्यमंत्री लगेचच येत आहेत, असा संदेश घेऊन गेलेल्या प्रशासनालाही मुख्यमंत्र्यांनी दिलेला चकवा संभ्रमात टाकणारा ठरला.
दरम्यान, एकीकडे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची दु:खे जाणून घेण्यासाठी आपण महाराष्ट्रात फिरत आहोत असे सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचेच काम केले, अशी प्रतिक्रिया माकपचे कॉ. विलास बाबर यांनी दिली. यावरून मुख्यमंत्र्यांना कोणतेच गांभीर्य नाही आणि केवळ स्टंटबाजी करायची आहे, असाही आरोप बाबर यांनी केला.