दिगंबर शिंदे

बागायतदारांच्या अडचणीत वाढ; रोजगाराच्या संधीही घटण्याची चिन्हे

pune vegetable prices marathi news, pune vegetable prices today marathi news
पुणे : अवकाळी पावसाचा फळभाज्यांना फटका; हिरवी मिरची, घेवडा, मटारच्या दरात वाढ
Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
As the temperature rises in the state of Maharashtra there is also an increase in the type of heat stroke pune
उष्माघाताच्या धोका! राज्यात रुग्णसंख्या ७७ वर; जाणून घ्या सर्वाधिक धोका कुठे…
How To Make Amchur At Home kairichi Amboshi Pickle recipe
आजीच्या पद्धतीनं घरच्या घरी “आंबोशी” या पद्धतीने बनवा; वर्षभर टिकणारी चटकदार रेसिपी एकदा पाहाच

खरिपाचा पेरा पावसाच्या लपंडावाने वाया गेला. परतीच्या पावसाने दगा दिला. खरीप, रब्बी हंगाम वाया गेल्यानंतर थंडीच्या हंगामात पुन्हा अवकाळीने गेले तीन दिवस थमान घालून मुख्य चलनी पीक असलेल्या द्राक्ष पिकांचे नुकसान केले आहे. एप्रिल-मे महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे ७० टक्के द्राक्ष बागांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये अवकाळीने सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागाचे अर्थकारणच कोलमडून पडण्याच्या स्थितीत आहे.

गेल्या वर्षी अपुऱ्या पाण्यामुळे अनेक द्राक्ष बागायतदारांनी एप्रिल महिन्यात होणाऱ्या द्राक्ष बागांच्या खरड छाटण्या अगदी मे अखेपर्यंत  लांबणीवर टाकल्या.  दुष्काळी भागाल वरदान ठरलेल्या म्हैसाळ, ताकारी, टेंभू, आरवडे या पाणीयोजना सुरू होण्यास विलंब झाला. विलंबाने या योजना सुरू झाल्यानंतर पाण्याची उपलब्धता झाल्यानंतर बागांच्या खरड छाटण्यांची घाई करण्यात आली. उपलब्ध पाण्यावर नवीन काडी तयारही झाली. मात्र, याचवेळी मे महिन्यात गारपीट झाली. याच्या जोडीला मे महिन्यातील तापमान ४३ अंशावर जाऊन पोहोचले होते. याचा एकत्रित परिणाम होऊन द्राक्ष काडीवर फलधारणा होऊन घड निर्मितीची प्रक्रियाच होऊ शकली नाही. काडी गव्हाळ रंगाची तयार होऊनही फलधारणा होऊन केवळ डोळे जिवंत राखण्याचेच काम झाले. ही बाब द्राक्ष बागायतदारांच्या फळछाटणीनंतर लक्षात आली.

फळछाटणीनंतर येणारे फुटवे घडाचे आले. मात्र, हे बहुतांशी घड हे अंगठा घडाच्या स्वरूपातच होते. एप्रिल -मे मधील गारपीट आणि वाढलेले तापमान यामुळे द्राक्ष काडीवर घड निर्मितीच होऊ शकली नाही. यामुळे या हंगामात मिरज, तासगाव, पलूस, कडेगाव, कवठेमहांकाळ तालुक्यांतील सुमारे ७० टक्के द्राक्ष बागांवर प्रतिकूल परिणाम झाला.

काही भागात पाण्याची स्थिती चांगली होती. या भागात द्राक्षबागांची स्थिती चांगली होती. तथापि, रविवारपासून या बागाही अवकाळीच्या तडाख्यात सापडल्या आहेत. ऑक्टोबर हंगामातील फळछाटणी झालेल्या बागा सध्या फुलोऱ्याच्या अवस्थेत आहेत, तर काही बागा या पोंगा अवस्थेत आहेत. अशावेळी अवकाळी पावसाने दमदारपणे हजेरी लावून द्राक्ष बागांची दैना उडविली आहे.

फुलोरा स्थितीत द्राक्षांचे घड असताना जर त्यावर पाणी पडले तर फुलोरा गळून जातो, तर ज्वारीच्या आकाराचे द्राक्ष मणी झालेल्या घडावर जर पाणी पडले तर पाणी तेथेच साचल्याने डावणी आणि पावडरी मिल्डयू यासारख्या बुरशीजन्य रोगांना हे थेट आमंत्रणच ठरते. डावणीला या भागात दावण्या या नावाने संबोधले जाते. या रोगाचा प्रसार वाऱ्यापेक्षा अधिक वेगाने होतो. २४ तासात अख्खी बाग या रोगाला बळी पडून होत्याचे नव्हते करण्याची ताकद या रोगात असल्याने शेतकरी या रोगाला प्रचंड घाबरतात. या रोगाला पोषक असे वातावरण या अवकाळीने निर्माण केले आहे.

हरभरा आकाराच्या मण्यामध्ये पाणी साचल्याने भुरीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता बळावते. तयार मालात पाणी साचले तर हातातोंडाशी आलेले पीक खराब होऊन हाती काहीच उरणार नाही, अशी भीती सध्या निर्माण झाली आहे.

द्राक्ष हंगामात या भागात दरवर्षी सुमारे पाच हजार कोटींची उलाढाल होत असल्याने यंदा सर्वच मुसळ केरात जाण्याची शक्यता अवकाळीने बळावली आहे. द्राक्षाच्या फळछाटणीपासून शेतमजुरांना चांगला रोजगार उपलब्ध होतो. अगदी सप्टेंबरपासून मार्च महिन्यापर्यंत शेतमजुरांना चार पसे मिळवून देणारा हा हंगाम यंदा विचित्र हवामानाच्या तडाख्यात सापडला आहे.

द्राक्ष हे चलनी पीक असल्याने यावर अनेक कुटुंबांचे वर्षांचे अर्थकारण अवलंबून असते. आधीच विहिरीने तळ गाठलेला आहे. िवधन विहिरीची खोली सहाशे-सातशे फुटांवर जाऊनही भूगर्भातील पाणीसाठा संपल्याने कोरडय़ा पडलेल्या आहेत. अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादकांच्या अडचणी वाढवल्या आहेत. यावर काढलेली कर्जे कशी फेडायची, यातच एखादे मंगलकार्य निश्चित केलेले असेल तर ते कसे तडीस न्यायचे या विचंचनेने ग्रासले असतानाच तळ गाठलेल्या विहिरीवर पुढील हंगामापर्यंत द्राक्ष वेल कशी जिवंत राखायची याची भीती सध्या द्राक्ष उत्पादकांच्या नजरेतून ओसंडत आहे.

एकीकडे अवकाळीने हाहाकार माजविला असताना आटपाडी तालुक्यातील दुष्काळी भागात डाळिंब उत्पादकांना या अवकाळीने दिलासा दिला आहे. भुंडया माळावर या भागात डाळिंब लागवड करण्यात आली असून, कमी पाण्यावर हे पीक घेतले जात आहे. यंदा पूर्ण पावसाच्या हंगामात अवघा ७२ मिलिमीटर पाऊस या तालुक्यात झाला. यामुळे विहिरींना पाझर तर फुटलाच नाही. सध्याचा पाणीसाठा पुढील आठ महिने पिण्यासाठी आणि जनावरांसाठी तरी पुरेल याची खात्री नाही. यामुळे अनेकांनी डाळिंबाचा हा बहारच घ्यायचा नाही असे निश्चित केले. मात्र, पुढील हंगामासाठी डाळिंबाचे झाड जिवंत राहणे आवश्यक असल्याने महिन्यातून दोनवेळा टँकरने पाणी देऊन डाळिंबाचे झाड जगविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यातील झरे, दिघंची, करगणी या भागात ही स्थिती असतानाच अवकाळीने रविवारी जोरदार हजेरी लावत ताली भरून ओसंडून वाहू लागल्याने किमान तीन महिने तरी डाळिंब जगविण्यासाठी टँकरवर होणारा खर्च वाचला आहे.

ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम

’फळछाटणीनंतर वांझ फुटवे काढणे, द्राक्ष घडांची विरळणी करणे, आलेला माल काढणे, रसायनमध्ये बुडवून बेदाणा निर्मितीसाठी शेडवर पाठविणे, वाळवणे, बेदाणा तयार झाल्यानंतर त्याची प्रतवारी निश्चित करून पॅकिंग करणे ते बाजारपेठेत बेदाणा पाठविणे इथेपर्यंत रोजगाराची संधी उपलब्ध असते.

’यंदा ७० टक्के बागांवर प्रतिकूल परिणाम झाल्याने रोजगाराची संधी कमी झाली आहेच, पण त्याचबरोबर या हंगामात वाहन उद्योगाला मिळणारे कामही कमी होणार आहे.