नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या सुधा भारद्वाज यांना पुणे न्यायालयाने सहा नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी सरकारी वकील उज्वला पवार यांनी न्यायालयाकडे केली होती. पण  न्यायालयाने सहा नोव्हेंबरपर्यंत त्यांना कोठडी सुनावली आहे. पुणे पोलिसांनी शनिवारी सकाळी हरियाणामधील फरियादाबाद येथील त्यांच्या निवासस्थानावरुन त्यांना ताब्यात घेतलं.

सुधा भारद्वाज या बंदी असलेल्या सीपीआय माओवादी संघटनेच्या सक्रिय सदस्य आहेत. माओवादी संघटनेमध्ये वेगवेगळ्या विद्यापीठातून विद्यार्थ्यांची भरती करणे आणि त्यांना जंगलातील दुर्गम भागात पाठवण्याची जबाबदारी सुधा भारद्वाज यांची होती. सुधा भारद्वाज सीपीआय माओवादी संघटनेच्या बऱ्याच बैठकीत सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे सुधा भारद्वाज यांची चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडी मिळावी असा युक्तीवाद सरकारी वकीलांनी केला.

सुधा भारद्वाज हाऊस अरेस्ट कस्टडी मध्ये असताना पुन्हा पोलिसांना पोलिस कस्टडी कशाला हवी अशा युक्तीवाद भारद्वाज यांच्या वकिलाने केला. पोलिस कोठडी सुनावणार असाल तर कोठडीत विजय मल्ल्याप्रमाणे सुविधा द्या, झोपण्यासाठी गादी, बसण्यासाठी खुर्ची, स्वच्छतागृह आरोग्यास हानीकारक नसावे असा अर्ज आरोपी सुधा भारद्वाज यांनी न्यायालयात केला.

दरम्यान अरुण परेरा आणि गोन्साल्विस यांना पुणे न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयाने त्यांना सहा नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

वेरनोन गोन्साल्विस, अ‍ॅड. सुधा भारद्वाज, अ‍ॅड. अरूण परेरा यांचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांनी शुक्रवारी फेटाळून लावला. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर बचाव पक्षाच्या वकिलांनी या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले.