पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष अनुदान निधीतून रामनगर परिसरातील विदर्भ हाऊसिंग कॉलनी येथे सिमेंट रस्ता, पेवर्स व सिमेंट नालीचे बांधकाम करण्यात आले. रस्ता व पेवर्स दिसत असले तरी नाली दिसत नसल्याने सदर नाली ही चोरीला गेली असल्याची तक्रार तेथील रहिवासी सुनील तिवारी यांनी रामनगर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, सिमेंट नाली कुठे आहे ते बांधकाम विभाग व कंत्राटदाराने दाखवून द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

चंद्रपूर महापालिकेच्या नगिनाबाग प्रभाग क्रमांक १३ अंतर्गत रामनगर परिसरातील विदर्भ हाऊसिंग कॉलनी येते. तक्रारकर्ते सुनील तिवारी या प्रभागातील रहिवासी आहेत. डिसेंबर २०१८मध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष अनुदान निधीतील विकास कामांचे भूमिपूजन झाले. यामध्ये विदर्भ हाऊसिंग कॉलनीतील समर्थ यांचे घरापासून तर डॉ.आस्वार हॉस्पिटलपर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता, सिमेंट नाली व पेवर्सच्या कामाचा समावेश होता.

रस्त्याच्या व पेवर्सच्या कामाला डिसेंबर २०१८ मध्ये सुरुवात झाली. हे काम सप्टेंबर २०१९ मध्ये पूर्ण झाले. सिमेंट रस्त्यासोबतच पेवर्स लावण्याचे काम संबंधित कंत्राटदाराने अतिशय योग्य पद्धतीने केले. मात्र ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने विदर्भ हाऊसिंग कॉलनीत लोकांची दिशाभूल करणारा एक फलक लावला.

या फलकावर रस्त्याचे काम व सदर काम तात्काळ पूर्ण केल्याची खोटी तारीख लिहिण्यात आली. मात्र या ठिकाणी प्रत्यक्षात नालीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले नाही. सिमेंट रस्ता, नाली व पेवर्स असे एकूण १२.५० लाखाचे हे काम आहे. प्रत्यक्षात कंत्राटदाराने रस्ता व पेवर्सचे काम पूर्ण केले आणि नाली बांधलीच नाही. या प्रभागातील जागरूक नागरिक सुनील तिवारी यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी थेट रामनगर पोलीस ठाण्यात नाली चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांनीही नाली चोरीची तक्रार मिळाल्याचे सांगितले. त्यामुळे आता ही नाली कंत्राटदाराने चोरली की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीच गिळंकृत केली, अशी चर्चा सुरू झाली आहे.