अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा टोला
राज्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या या मागच्या सरकारचा पुरुषार्थ आहे, असा सणसणीत टोला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. राज ठाकरे यांनी ५० पसे खर्चून मला फोन केला असता तर त्यांना विहिरीबद्दल माहिती दिली असती, असे सांगत राज यांना लक्ष्य केले. राज्य पुनर्रचना आयोगाने छोट्या राज्यांबाबत जी मतं मांडली आहेत त्याचा आदर करायचा की अवमान हे वेगळ्या विदर्भावर विचारणाऱ्यांनी ठरवावे, असे त्यांनी वेगळ्या विदर्भाबाबतची भूमिका स्पष्ट केली. ते पंढरपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे बुधवारी पंढरपूर येथे एकदिवसीय दौऱ्यावर आले होते. या दौऱ्याच्या सुरुवातीला त्यांनी श्री विठ्ठल-रुख्मिणीचे दर्शन घेतले. त्या नंतर त्यांनी चंद्रभागा नदीची पूजा केली. नमामि चंद्रभागा अभियानचा प्रारंभ केला. या अभियानासाठी एक संकेतस्थळ तयार करणार असून या माध्यमातून सर्वसामान्य भाविक,यातील अभ्यासक,परदेशातील विठ्ठल भक्त या बाबत काही सूचना,माहिती देतील. त्यांना विचारात घेऊन हे अभियान अधिक चांगले करता येईल असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले . येणाऱ्या भाविकाला पवित्र आणि स्वच्छ नदीपात्र भविष्यात दिसेल असेही त्यांनी सांगितले.
राज्यात आज होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा मागच्या सरकारचा पुरुषार्थ आहे, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. राज्य सरकारने शेतकऱ्याच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. दोन हजार शेततळी, ३७ हजार ५०० विंधन विहिरी, ९० हजार विद्युत कनेक्शन दिले आहेत. शेतकरी जगला पाहिजे,स्वत:च्या पायावर उभा राहिला पाहिजे हे सरकारचे ध्येय आहे, असेही त्यांनी सांगितले. वेगळ्या विदर्भाबाबत भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले की, कोणत्याही वेगळ्या राज्याचा मुद्दा हा भावनेचा नाही तर घटनेच्या आधारावर तपासावा.
राज्य पुनर्रचना आयोगाने छोट्या राज्यांबाबत जी मतं मांडली आहेत त्याचा आदर करायचा की अवमान हे वेगळ्या विदर्भावर विचारणाऱ्यांनी ठरवावे, असे मत मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

पंढरपूर विकासासाठी ३ घोषणा
पंढरपूरच्या विकासाबाबत अर्थमंत्री यांनी तीन घोषणा केल्या. भाविकांसाठी संकीर्तन सभागृह उभारणार या साठी जागा उपलब्ध करून द्या,निधीची कमतरता पडू देणार नाही अशी घोषणा मुनगंटीवार यांनी केली. भुयारी गटार योजना टप्पा ३ साठी ४८ कोटी रुपये मंजूर केल्याचे त्यांनी जाहीर केले. तर नमामि चंद्रभागा अभियानासाठी एक स्वतंत्र संकेतस्थळ तयार केऊन त्यावर सूचना मांडणाऱ्यांचे स्वागत करू असे जाहीर केले.