शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रायश्चित्त घेण्याची गरज आहे. पश्चाताप करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, अशी टीका वनमंत्री सुधार मुनगंटीवार यांनी केली.शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादीने पक्षाध्यक्ष पवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता. या आंदोलनासंदर्भात मुनगंटीवार यांना विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. गेली १५-२० वर्षे राज्याचा कारभार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात होता. या वर्षांत त्यांनी केलेल्या चुकीच्या नियोजनाची फळे आता भोगावी लागत आहेत. शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या शरद पवार यांच्या पुतण्यांनी सिंचन कामात भ्रष्टाचार केला आणि ते हे का विसरले, असा प्रश्न मुनगंटीवार यांनी यावेळी उपस्थित केला. त्यांनी केलेला भ्रष्टाचार, चुकीचे नियोजन यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. आमच्यासमोर येऊन आंदोलन करण्यापेक्षा त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर जाऊन आंदोलन करावे, असे मुनगंटीवार म्हणाले. आम्हाला अवघे आठच महिने झाले आहेत. तरीही आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखून दाखवू, असेही ते म्हणाले.
तेंडुलकरांची तयारी
व्याघ्र संवर्धन व संरक्षणासाठी काम करण्याची तयारी सचिन तेंडुलकर यांनी दर्शवली आहे. वनखात्याच्या कोणत्याही क्षेत्रात त्यांनी काम करण्याची तयारी दर्शवल्याने वनधन-जनधनाच्या योजनेसाठी सचिन तेंडुलकर यांचे सहकार्य घेण्याचे संकेत त्यांनी दिले. अमिताभ बच्चन यांनी व्याघ्रदूत होण्यासाठी किती मानधन घेतले, यावर एक रुपयादेखील मानधन न घेता ‘बिग बी’ यांनी काम करण्याची तयारी दर्शवल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वनधन जनधन योजनेत काम करण्याची तयारी त्यांनी दर्शवल्याचे ते  म्हणाले.