News Flash

रत्नागिरी जिल्ह्य़ातील विकासकामांसाठी आवश्यक निधी देण्याचे प्रयत्न -पालकमंत्री उदय सामंत

जिल्ह्य़ातील विविध विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आवश्यक निधी देण्याचा प्रयत्न असून त्यासाठी आवश्यकता भासल्यास वाढीव निधी आणण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल,

| November 22, 2013 02:15 am

जिल्ह्य़ातील विविध विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आवश्यक निधी देण्याचा प्रयत्न असून त्यासाठी आवश्यकता भासल्यास वाढीव निधी आणण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे नगरविकास, वने, बंदरे, मत्स्य व्यवसाय, विधी व न्याय, खार जमीन, क्रीडा व युवक कल्याण, माजी सैनिकांचे कल्याण, मराठी भाषा राज्यमंत्री तथा जिल्ह्य़ाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा जाधव, खासदार डॉ. नीलेश राणे, आमदार सूर्यकांत दळवी, राजन साळवी, सदानंद चव्हाण, जिल्हाधिकारी राजीव जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय आहेर आदी उपस्थित होते.
जिल्हा नियोजन समितीने २०१३-१४ साठी वार्षिक प्रारूप आराखडा २५० कोटींचा करून शासनाकडे पाठविण्याचा ठराव एकमताने मंजूर केला. जिल्ह्य़ाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचे प्रयत्न असल्याचे या वेळी नमूद करून सामंत म्हणाले, जिल्ह्य़ात अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून २५ कोटी ३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता रस्ता दुरुस्तीबाबतचा प्राधान्यक्रम ठरविणार आहेत. त्यासाठी परिवहन विभाग आणि जिल्हा परिषदेचा अहवालही विचारात घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्य़ातील क्रीडाविकासाबाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले, जिल्हा क्रीडा संकुलासाठी १२ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, ५ कोटी ५८ लाखांचा निधी क्रीडा विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.
 लवकरच क्रीडा संकुलाच्या कामाला आरंभ करण्यात येणार असल्याचे सांगून पायका अभियानांतर्गत क्रीडाविकासाची कामे वेगाने पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. सदस्यांच्या सूचनेनुसार ग्रामीण भागातील बंद करण्यात आलेल्या एसटी बससेवा जनतेची सोय लक्षात घेता सुरू करण्याच्या सूचना त्यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. बससेवा अपरिहार्य कारणास्तव बंद करताना संबंधित गावातील ग्रामपंचायतीला पूर्वसूचना देण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
पालकमंत्री म्हणाले, नळपाणी योजनांचा वीजपुरवठा पूर्वसूचना न देता खंडित करू नये. पाणी जनतेसाठी अत्यावश्यक बाब असल्याने ग्रामपंचायतीशी चर्चा करून विशिष्ट हप्त्यात थकबाकी भरण्याची सुविधा देण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.
कसबा येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यावर मेघडंबरी बसविण्यासाठी आणि कोट येथील झाशीच्या राणी यांच्या स्मारकाला आवश्यक तेवढा निधी देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी विशेष घटक योजना आणि आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना सन २०१४-१५ यांना मान्यता देण्यात आली. बैठकीला नियोजन समितीचे सदस्य आणि विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2013 2:15 am

Web Title: sufficient development funds try to allot for ratnagiri district uday samant
टॅग : Ratnagiri District
Next Stories
1 जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रद्द करण्याची जागतिक मच्छीमारीदिनी मच्छीमारांची मागणी
2 ढाकणे यांचे आजपासून ‘वर्षा’ समोर धरणे
3 ..हा प्रश्न महिलांनाच का?
Just Now!
X