गेल्या आठ दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर वाढू लागले असल्याने सवलतीच्या योजनेशिवाय निर्यात करता येईल काय, याची चाचपणी कारखानदार करू लागले आहेत. इंडोनेशियामधून साखरेची मागणी वाढली आहे आणि ब्राझीलमधून साखर उत्पादन बाजारपेठेत येण्याचा कालावधी एप्रिलपासून सुरू होत असल्याने गेल्या दीड महिन्यापासून बिघडत चाललेले अर्थकारण काही अंशी रुळावर येऊ शकते, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. २९ डिसेंबरपासून साखरेच्या दरात १४.९८ सेंट प्रतिपाउंड वाढली म्हणजे २५ रुपये २८ पैसे प्रतिकिलो असणारा दर ५ जानेवारीपर्यंत १६.२५ सेंट प्रतिपाउंड म्हणजे २७ रुपये ३१ पैसे प्रतिकिलो एवढा वाढला. या वर्षी केंद्र सरकारने ६० लाख टन कच्ची साखर निर्यातीस अनुदान दिले आहे. त्यामुळे ‘निर्याती’ला साखर गोड असे चित्र दिसून येत आहे. हे चित्र मार्च अखेरीपर्यंत कायम राहील असे सांगण्यात येत आहे. दरातील ही वाढ २०१७ नंतरची सर्वाधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. या वर्षी साखर निर्यातीस केंद्र सरकारने कमाल निर्यात धोरणातून ६० लाख टनांपर्यंत ६ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. पूर्वी हे अनुदान दहा हजार ४०० रुपये होते. मात्र, आतंरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर आता वाढू लागले आहेत. त्यामुळे राज्यातील साखर कमाल निर्यात अनुदानाशिवाय केली तरी आर्थिक लाभ होईल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे साखर कारखाने निर्यातीची साखर गोड मानू लागले आहेत.
सर्वसाधारणपणे भारतातून कच्ची साखर निर्यात केली जाते. त्याचे शुद्धीकरण करून त्यापासून १५ ते १६ प्रकारची साखर केली जाते. जागतिक बाजारपेठेतील दर वाढत असले, तरी भारतातील उसाचा दर आणि साखरेची ३१०० रुपये प्रतिक्विंटल ही कमाल किंमत यामुळे देशी साखरेतील तोटा निर्यातीतून भरून निघण्याची शक्यता असल्याने तसे सौदे होत आहेत. आठवडाभरात प्रतिकिलो दोन रुपयांहून अधिक वाढलेले दर आशादायक असल्याचे सांगण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील दर गेल्या आठ दिवसांपासून झपाटय़ाने बदलू लागले आहेत. इंडोनेशियामधून साखरेस मागणी आहे. त्यामुळे कच्ची साखर निर्यातीस चांगले दिवस आले आहेत. जोपर्यंत ब्राझीलचे उत्पादन बाहेर पडणार नाही, तोपर्यंत साखर दर चढेच राहतील. म्हणजे मार्चअखेरीपर्यंत हीच स्थिती राहील. त्यामुळे साखर कारखाने आता अनुदानाशिवायही साखर निर्यात करण्याच्या विचारात आहेत. – जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष राष्ट्रीय साखर संघ
थायलंडमध्ये या वर्षी दुष्काळामुळे उत्पादन फारसे होणार नाही तर ब्राझीलमध्येही ऊसक्षेत्र कमी करण्यावर भर देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे येत्या काळात साखर तेजीत राहील. आंतरराष्ट्रीय बाजारातील या घडमोडींचा राज्यातील कारखानदारीवर चांगला परिणाम होईल. गेल्या आठ-दहा दिवसांतील भाव आश्वासक आहेत. केवळ कच्ची साखर नाही तर पांढरी निर्यातक्षम साखरेचे दरही आता मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. ही वाढ एरवीपेक्षा खूप अधिकही आहे. – बी. बी. ठोंबरे, अध्यक्ष नॅचरल शुगर
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 9, 2021 1:34 am