ऊस दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनास आज येथे हिंसक वळण लागले. सांगली-पलूस मार्गावर शनिवारी ६ बसवर आंदोलकांनी दगडफेक केली. यामध्ये एसटीचा एक वाहक जखमी झाला असून या मार्गावरील एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तर दुसरीकडे कवठेपिरान येथे हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याचे गट कार्यालय जाळण्यात आले आहे.
ऊस आंदोलनात संघटनेचे कार्यकत्रे ऊस दराबाबतचे निर्णय घेण्यास विलंब होऊ लागताच आक्रमक होत आहेत. पलूस, कडेगाव, वाळवा, खानापूर, तासगाव या ठिकाणी सुरू असलेल्या ऊस तोडी बंद पाडण्याबरोबरच ऊस वाहतूक रोखण्यात अग्रेसर आहेत. गुरुवारी मध्यरात्री कवठेपिरान (ता. मिरज) येथील हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याच्या गट कार्यालयास आग लावण्यात आली. या आगीत कार्यालय जळून खाक झाले असून कागदपत्रेही बेचिराख झाली आहेत. आष्टा, नागठाणे, दुधोंडी, पुणदी, कुंडल, वांगी, चिंचणी, देवराष्ट्रे, मांगले, देववाडी, नवेखेड, जुनेखेड आदी परिसरात आंदोलनाची तीव्रता वाढत चालली आहे.
शनिवारी सांगली-पलूस मार्गावर नांद्रे आणि वसगडे या गावा दरम्यान आंदोलक शेतकऱ्यांनी वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. या वेळी राज्य परिवहन महामंडळाच्या ६ बसेसवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये १ वाहक किरकोळ जखमी झाला. एस.टी. महामंडळाने या मार्गावरील वाहतूक सेवा तात्पुरती बंद ठेवली आहे.
सर्वपक्षीय बैठकीत तोडग्याचा गोडवा नाही
ऊसदर आणि साखर उद्योगाच्या अडचणीसंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी बोलाविलेली बैठक निष्फळ ठरली. राज्यातील साखर उद्योगाला केंद्राने मदत द्यावी, या मागणीसाठी मंगळवारी पंतप्रधानांच्या भेटीसाठी शिष्टमंडळ नेण्याचा एकमात्र निर्णय वगळता या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांच्या उग्र आंदोलनाने जेरीस आलेले साखरसम्राट अधिकच अस्वस्थ झाले आहेत.
साखर कारखान्यांनी तीन हजार रुपयांची पहिली उचल द्यावी म्हणून साखर पट्टय़ात सुरू झालेल्या आंदोलनामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील सारेच साखर सम्राट अस्वस्थ झाले आहेत.