11 December 2018

News Flash

सोलापुरात ऊस आंदोलन पेटले; आता दरासाठी ‘रक्तदान’

अक्कलकोटमध्ये मुंडन, ट्रॅक्टरला आग लावली

सोलापूर जिल्ह्य़ात ऊसदराचा तिढा न सुटल्यामुळे शेतकरी संघटनांनी आंदोलनाचे हत्यार पुन्हा उपसले आहे. अक्कलकोट येथे प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वत:चे मुंडन करून घेत शासनाचा निषेध नोंदविला. मंगळवेढय़ाजवळ ऊसवाहतुकीच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला आग लावण्याचा प्रकारही घडला.

अक्कलकोटमध्ये मुंडन, ट्रॅक्टरला आग लावली

सोलापूर जिल्ह्य़ातील ऊसदराच्या प्रश्नावर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या पुढाकाराने झालेल्या वाटाघाटी फिस्कटल्यानंतर आक्रमक झालेल्या शेतकरी संघटनांनी आंदोलनाचे हत्यार पुन्हा उपसले आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना प्रहार जनशक्ती संघटनेने लक्ष्य करीत, त्यांच्या बंगल्यासमोर येत्या १७ नोव्हेंबर रोजी रक्तदान करून ऊसदराची मागणी करण्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, साखर कारखान्यांकडे गाळपासाठी जाणाऱ्या ऊसवाहतुकीची वाहने रोखण्याचे प्रकार घडतच आहेत.

अक्कलकोट येथे प्रहार शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वत:चे मुंडन करून सहकारमंत्र्यांचा निषेध नोंदविला. तर दुसरीकडे ऊसवाहतूक रोखण्याचे प्रकार घडत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेता साखर कारखान्यांसाठी पोलीस संरक्षण देण्याची तयारी दर्शविली आहे. जिल्ह्य़ात साखर कारखान्यांतील गळीत हंगाम सुरळीतपणे होण्यासाठी प्रसंगी कलम १४४  पुकारण्याचाही आदेश जिल्हा प्रशासन विचार करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रहार शेतकरी संघटनेने ऊसदराच्या प्रश्नावर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची भूमिका साखर कारखानदारांचे हित जपणारी व शेतक ऱ्यांचे नुकसान करणारी असल्याची टीका करीत अक्कलकोट येथे रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी शेतकरी कार्यकर्त्यांनी स्वत:चे मुंडन करून घेत सहकारमंत्री व शासनाचा निषेध नोंदविला. एवढेच नव्हे तर शेतकरी संघटनांच्या मागणीनुसार ऊसदर मिळाला नाही तर येत्या काही दिवसात सहकारमंत्री देशमुख यांच्या लोकमंगल साखर कारखान्यात घुसून सामूहिक आत्महत्या करण्याचा इशाराही प्रहार शेतकरी संघटनेच्या सोलापूर जिल्हा शाखेचे प्रभारी अध्यक्ष राज चव्हाण यांनी दिला आहे. या वेळी ऊस उत्पादक शेतकरी जंगले गुरूजी यांनी, शासनाने ऊसदराच्या प्रश्नावर ‘गांधारी’ची भूमिका न घेता त्वरित प्रति टन उसाला तीन हजार रुपये दर जाहीर करावा, अशी मागणी केली. या आंदोलनात गंगाधर जाधव, नितीन मोरे, विकी चौधरी, ईरण्णा परतनाळे यांच्यासह अक्कलकोट तालुक्यातील चुंगी, कुरनूर, हन्नूर, बुऱ्हाणपूर, चपळगाव आदी गावांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता.

प्रहार संघटनेने सहकारमंत्री देशमुख यांच्या बंगल्यासमोर येत्या १७ नोव्हेंबर रोजी रक्तदान करून ऊसदराची मागणी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. ही माहिती संघटनेचे संपर्क प्रमुख अतुल खुपसे यांनी दिली. ‘रक्त घ्या, पण ऊसदर द्या’ अशी हाक सहकारमंत्र्यांना दिली जाणार असल्याचे खुपसे यांनी सांगितले.

सोलापूर-पंढरपूर रस्त्यावर मोहोळ व पंढरपूर तालुक्यात ठिकठिकाणी शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ऊसवाहतूक रोखण्याचे सत्र आरंभले आहे. ऊसवाहतुकीच्या मालमोटारीसह ट्रॅक्टर ट्रॉल्यांच्या चाकांची हवा सोडण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात ऊस वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे दिसून आले. मंगळवेढा तालुक्यातही ऊसवाहतूक रोखण्याचे प्रकार घडत आहेत. मंगळवेढय़ाच्या एका साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला अज्ञात व्यक्तींनी आग लावून पेटवून दिले. सोमवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेची जबाबदारी कोणत्याही शेतकरी संघटनेने घेतली नाही.

First Published on November 15, 2017 1:20 am

Web Title: sugarcane agitation in solapur