सांगली : ऊसदरासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी पहाटे हिंसक वळण लागले असून, कामेरीतील राजारामबापू साखर कारखान्याचे कार्यालय आणि दोन ट्रॅक्टर ट्रॉलींना आगी लावण्याचे प्रकार घडले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला असतानाच तत्पूर्वी आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे.

मध्यरात्री वाळवा तालुक्यातील कामेरी येथे असलेल्या राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयास अज्ञातांकडून आग लावण्यात आली. या आगीमध्ये कार्यालयात असलेल्या कागदपत्रांचे नुकसान झाले असून, आज सायंकाळपर्यंत या बाबत पोलीस ठाण्यात मात्र कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती. तसेच आष्टा आणि मिरज तालुक्यातील वडी येथे दोन ट्रॅक्टर ट्रॉलींना आगी लावण्यात आल्या.

या वाहनातून ऊस वाहतूक करण्यात येत होती. रात्रीच्या वेळी सुरू असलेली चोरटी ऊस वाहतूक रोखण्यासाठी या वाहनांना आगी लावण्यात आल्या.

उसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये प्रतिटन दर जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत केली आहे. या बाबत एफआरपीही देणे अशक्य असल्याचे सांगत कोल्हापूर जिल्हय़ातील साखर कारखाने बंद ठेवण्यात आले असले तरी सांगली जिल्हय़ातील काही कारखाने सुरू ठेवण्यात आले आहेत. कामगार  आणि वाहतूकदार यांच्यावर दबाव आणून ऊसतोड करण्यात येत असल्याचा आरोप खा. राजू शेट्टी यांनी केला. यानंतर हे आंदोलन तीव्र झाले आहे.

दरम्यान, संघटनेने ऊसदरासाठी रविवारी ऊसपट्टय़ातील चार जिल्हय़ांत चक्काजामचे आवाहन केले असून, या दिवशी महामार्गासह सर्वच ठिकाणी रास्ता रोको करण्यात येणार असल्याचे खा. शेट्टी यांनी जाहीर केले आहे. ऊसदरासाठी प्रसंगी कायदा हातात घेण्याचा इशाराही त्यांनी दिला असल्याने कार्यकत्रे आक्रमक झाले आहेत.