नगरमध्ये आंदोलकांच्या हिंसक पवित्र्यामुळे चिघळलेले ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन समाधानकारक तोडगा निघाल्यामुळे बुधवारी संध्याकाळी मागे घेण्यात आले. शेवगावात आज सकाळी या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. पोलिसांनी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी पैठण-शेवगाव रोडवरील वाहतूक टायर आणि लाकडे जाळून रोखून धरली होती. यावेळी येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलीसांमध्ये आणि आंदोलकांत बाचाबाची झाली. यावरून शेतकरी आणखीनच आक्रमक झाले. तेव्हा त्यांना आवरण्यासाठी पोलिसांनी सुरूवातीला अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. मात्र, तरीही परिस्थिती नियंत्रणात येत नव्हती. त्यामुळे पोलिसांकडून हवेत गोळीबारही करण्यात आला. यामध्ये उद्धव मापारे आणि बाबुराव दुकळे हे दोन शेतकरी जखमी झाले. त्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळून या आंदोलनाचे लोण राज्यभरात पसरण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर नगरमध्ये शीघ्र कृती दल आणि राखीव दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या.

नगरमध्ये ऊस आंदोलन चिघळले, पोलिसांचा हवेत गोळीबार; दोन जखमी

मात्र, आज संध्याकाळी समन्वय समितीच्या बैठकीनंतर अखेर हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय झाला.  या बैठकीमध्ये कारखानदार, आंदोलक, शेतकरी आणि सरकारच्या प्रतिनिधींचा समावेश होता. यावेळी ऊसासाठी पहिली उचल म्हणून २,५२५ रूपयांची रक्कम निश्चित करण्यात आली. यापूर्वी कारखानदरांनी १९४० रूपयांची पहिली उचल देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, आजच्या बैठकीनंतर त्यामध्ये ५७५ रूपयांची वाढ झाली. याशिवाय, तसेच एफआरपीचा ७०-३० फॉर्म्युला बैठकीत मान्य करण्यात आला. याशिवाय, आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले ३०७ चे गुन्हे मागे घेण्याचे आश्वासनही सरकारच्यावतीने देण्यात आले.