माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे मत; सेवागिरी कृषी पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन
पश्चिम महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या ऊसशेतीसाठी पाण्याचा अपव्यय होत असतो. या विभागात ५० टक्के पाणी बचतीसाठी ऊसशेती पूर्णत: ठिबक सिंचनाद्वारे होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रबोधानाबरोबर ठिबकचे अनुदान वेळेत मिळाले पाहिजे. मुख्यमंत्री असताना जिहे-कठापूर योजनेसाठी मंजूर केलेल्या १६० कोटींपैकी ८० कोटी दिले आहेत. उर्वरित रक्कम विद्यमान शासनाने दिल्यास खटाव-माण हा भाग सुजलाम-सुफलाम् होईल, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. पुसेगाव येथील राज्यस्तरीय श्री सेवागिरी कृषी पशुपक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटन अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. या वेळी चव्हाण यांच्यासह आमदार जयकुमार गोरे, आनंदराव पाटील, विश्वस्त मोहनराव जाधव, शुअरशॉट इव्हेंटचे संचालक संदीप गिड्डे उपस्थित होते.
नैसर्गिक असमतोलामुळे महाराष्ट्रातील शेतकरी चिंताग्रस्त असून, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी श्री सेवागिरी महाराजांनी बळ द्यावे असे साकडे बापट यांनी घातले. ते म्हणाले,ह्वआपत्कालीन परिस्थितीत शासनव्यवस्था चालविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय केला पाहिजे. दिवसेंदिवस निसर्ग बदलत आहे. त्याचा मोठा फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. शेतकऱ्यांची कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. शेतकरी व त्याचे कुटुंब सुस्थितीत राहिले, तर शासनव्यवस्था अबाधित राहू शकते.
शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवून शासन राबवत असलेल्या विविध योजना यशस्वी करण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. शेतकरी आणि संबंधित प्रशासन सजग राहिल्यास भविष्य उज्ज्वल असेल.
जयकुमार गोरे म्हणाले की, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टने येरळा नदी पुनरूज्जीवनाच्या माध्यमातून प्रभावी काम सुरू केले आहे. जिहे-कठापूर योजना खटाव-माणला नवसंजीवनी देणार असल्यामुळे शासनाने तातडीने या योजनेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. शासनाने दुष्काळी व टंचाईग्रस्त भागाला झुकते माप द्यावे अशी मागणी त्यांनी केली.
आनंदराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी केले.

सुनील साोळुंखे सेवागिरी केसरी
श्री सेवागिरी महाराजांच्या ६८ व्या पुण्यस्मरणानिमित्त व श्री नारायणगिरी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजिलेल्या कुस्ती आखाडय़ातील ‘सेवागिरी केसरी’ किताबासाठी हिंदकेसरी पहिलवान सुनील साळुंखे विरूध्द महाराष्ट्र केसरी पहिलवान समाधान घोडके यांच्यात लढत झाली. या लढतीत सुनील साळुंखे याने समाधान घोडकेवर एका गुणावर विजय मिळवून एक लाख ५१ हजारांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस व सेवागिरी केसरी पदाचा बहुमान पटकावला.
राजकारण हा विषय निवडणुकीपुरता मर्यादित ठेवून सर्व पक्षांनी सामाजिक बांधीलकीच्या जाणिवेतून एकत्र येण्याची गरज असून, तसे झाल्यास बळीराजाचे विविध प्रश्न तातडीने मार्गी लागतील. शासकीय योजनांची नीट अंमलबजावणी झाल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या निश्चित थांबतील
– गिरीश बापट