एकीकडे पाण्याअभावी दुष्काळाच्या छायेत असूनही मोठय़ा प्रमाणात ऊस उत्पादनामुळे देशात सर्वाधिक साखर कारखाने याच सोलापूर जिल्ह्य़ात आहेत. आतापर्यंत सहकारी व खासगी मिळून ३४ साखर कारखाने असताना त्यात आणखी एका साखर कारखान्याची भर पडली आहे. परंतु याच वेळी यंदा ऊस उत्पादन घटल्यामुळे त्याचा फटका गाळप हंगामाला बसला आहे. त्यामुळे अवघ्या दोन-तीन महिन्यांतच साखर कारखान्यांना गळीत हंगाम आवरता घ्यावा लागत आहे. आजमितीस सुमारे एक कोटी मे. टन ऊस गाळप झाला असून ऊस शिल्लक नसल्यामुळे तब्बल २७ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम बंद पडला आहे.

दुष्काळसदृश परिस्थितीचे संकट सोलापूर जिल्ह्य़ास नवीन नाही. परंतु त्याच वेळी सर्वाधिक ऊसलागवड करणारा जिल्हा म्हणून सोलापूरची सार्वत्रिक ओळख आहे. तीन वर्षांपूर्वी या जिल्ह्य़ात ३० साखर कारखान्यांनी सुमारे एक कोटी ९० लाख मे. टन इतक्या विक्रमी उसाचे गाळप केले होते. यातच साखर कारखानदारी आणखी वाढत आहे. आज जिल्ह्य़ात ३५ व्या साखर कारखान्याची भर पडली आहे. विजापूर रस्त्यावर औराद (ता. दक्षिण सोलापूर) येथे लोकशक्ती शुगर अ‍ॅन्ड अलाईड कारखान्याचा प्रथम चाचणी गळीत हंगाम अग्निप्रदीपन शुभारंभ झाला आहे. एकीकडे ऊस उपलब्ध होणे कठीण असताना साखर कारखान्यांची संख्या मात्र वाढतच चालली आहे. नजीकच्या काळात साखर कारखान्यांची संख्या ४० पर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

उजनी धरणामुळे जिल्ह्य़ात ऊस लागवडीचे क्षेत्र वाढत असून सध्या सुमारे अडीच लाख हेक्टर क्षेत्रात उसाची लागवड होते. परंतु उजनी धरणात पाणी नाही. तर दुसरीकडे पाऊस नसल्यामुळे पाणीटंचाई वाढली आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत ऊस शेती धोक्यात आली आहे. पाण्याअभावी ऊस जळून जात आहे. तर दुसरीकडे उसाची लागवडही घटत चालली आहे.

गेल्या नोव्हेंबरमध्ये जिल्ह्य़ात साखर कारखान्यांमध्ये गळीत हंगामाला प्रारंभ झाला होता. परंतु अवघ्या तीन-साडेतीन महिन्यांतच ऊस संपत आल्यामुळे गळीत हंगाम बंद होत आहे. अक्कलकोटचा स्वामी समर्थ आणि सांगोला येथील शेतकरी हे दोन आजारी असलेल्या सहकारी साखर कारखान्यांनी उसाचे गाळप केलेच नाही. उर्वरित ३२ साखर कारखान्यांमध्ये १२ सहकारी आणि २० खासगी असे मिळून ३२ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम केला आहे. यात आतापर्यंत सुमारे एक कोटी मे. टन उसाचे गाळप होऊ शकले. आणखी ऊस शिल्लक नसल्यामुळे बहुसंख्य म्हणजे २७ साखर कारखान्यांचा पट्टा पडला आहे. गाळप सुरू असलेल्या साखर साखर कारखान्यांमध्ये अकलूजचा सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सरकारी साखर कारखाना (१० लाख ५५ हजार मे. टन, ११.२६ टक्के साखर उतारा), माढा येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना (१६ लाख ६ हजार मे. टन, १०.६९ टक्के साखर उतारा) यासारख्या अवघ्या ५ साखर कारखान्यांचा हंगाम सुरू आहे.

जिल्ह्य़ातील पाण्याचा प्रश्न गंभीर असल्यामुळे त्याचा मोठा फटका ऊस लागवडीला बसला आहे. त्यामुळे ऊसटंचाई निर्माण होऊन साखर कारखान्यांना गळीत हंगाम आटोपता घ्यावा लागत असताना पुढच्या वर्षांतील साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाची स्थिती आणखी भयानक स्वरूपाची राहणार आहे. पुढील वर्षी ४० पैकी ३५ साखर कारखानेही चालणार नाहीत, अशी भीती माढय़ाच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, आमदार बबनराव शिंदे यांनी व्यक्त केली आहे.  एकीकडे साखर दर व अन्य प्रश्नांमुळे साखर कारखानदारी अडचणीत असताना सद्य:स्थितीत किमान दोन लाख मे. टन ऊस गाळप केले तरच साखर कारखाना कसाबसा तग धरू शकतो. त्यापेक्षा कमी प्रमाणात उसाचे गाळप करणे आर्थिकदृष्टय़ा परवडत नाही, सोलापूर जिल्ह्य़ात शंकर (सदाशिवनगर), आदिनाथ (करमाळा), संत कूर्मदास (माढा), लोकमंगल अ‍ॅग्रो (बीबी दारफळ, उत्तर सोलापूर), विजय शुगर (करकंब, पंढरपूर), सीताराम महाराज (खर्डी, पंढरपूर), शेतकरी (चांदापुरी, माळशिरस आदी साखर कारखान्यांना प्रत्येकी दोन लाख मे. टनाच्या आतच ऊस गाळप करावा लागला आहे. त्यामुळे या कारखान्यांची आर्थिक स्थिती समाधानकारक नसल्याचे सूत्रांनी सांगितले.