आपण राज्याचे सहकारमंत्री असलो तरी ऊसदराच्या प्रश्नावर एकटा मार्ग काढू शकत नाही. शासन एफआररीपेक्षा जास्त ऊसदर देण्यास साखर कारखानदारांना सांगू शकत नाही. वाढील ऊसदराच्या संदर्भात सर्व साखर कारखानदारांसोबत चर्चा करूनच मार्ग काढावा लागणार आहे. परंतु आपणास या प्रश्नावर जाणीवपूर्वक लक्ष्य बनविले जात आहे, अशा शब्दांत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापुरातील ऊस आंदोलनाबाबत साखर कारखानदारांसमोर आपण हतबल असल्याचे सूचित केले.

ऊसदराच्या प्रश्नावर सोलापूर जिल्ह्य़ात सहकारमंत्र्यांना शेतकरी संघटनांनी विशेष लक्ष्य केले आहे. त्यांच्या बंगल्यासमोर आंदोलने होत आहेत. त्यांच्या स्वत:च्या ‘लोकमंगल’ नावाच्या दोन्ही साखर कारखान्यांचा गाळप हंगामही बंद पाडण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवर देशमुख यांनी पंढरपुरात रविवारी येऊन तेथे मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी कार्यकर्त्यांच्या उपोषणस्थळी भेट दिली. त्यावेळी बोलताना त्यांनी दोन दिवसांत ऊसदरावर तोडगा काढण्याचे आश्वासन देत, उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांच्या वक्तव्यातून जणू हतबलता दिसून येत होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आपण पंढरपुरात येऊन उपोषणार्थी शेतकरी कार्यकर्त्यांना भेटत असल्याचे देशमुख यांनी नमूद केले. जिल्ह्य़ातील ऊसदराच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आपण पालकमंत्री विजय देशमुख यांना पुढाकार घेण्यासाठी बोललो होतो. जिल्हाधिकाऱ्यांनाही तशा सूचना दिल्या होत्या. मुख्यमंत्री फडणवीस यांचेही या प्रश्नाकडे लक्ष असल्याचे देशमुख यांनी सांगितले. मात्र त्यांच्या आवाहनाला उपोषणार्थी शेतकरी कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

सोलापूरसह मंगळवेढा, पंढरपूर, माढा आदी भागांत ऊस आंदोलनाची झळ साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला पोहोचत असल्याचे दिसून आले. पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे एका एसटी बसवर दगडफेक झाली. अनेक ठिकाणी रस्त्यावर ऊसवाहतुकीच्या ट्रॅक्टर ट्रॉल्यांचे टायर फोडण्यात येत आहेत.

लोकमंगलचे गाळप बंद

दरम्यान, जिल्ह्य़ातील ऊस आंदोलनाची परिस्थिती चिघळलेलीच असून रविवारी सहकारमंत्री देशमुख यांच्या खासगी मालकीचे लोकमंगल नावाचे दोन्ही साखर कारखाने शेतकरी संघटनांनी बंद पाडले. बीबीदारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथील साखर कारखान्याचे गाळप जनहित शेतकरी संघटनेने रोखले तर भंडारकवठे (ता. दक्षिण सोलापूर) येथील साखर कारखान्याचे गाळप बळीराजा शेतकरी संघटनेने काल शनिवारीच रोखले होते. रविवारी, तिसऱ्या दिवशीही दोन्ही साखर कारखान्यांसमोर दोन्ही शेतकरी संघटनांचे धरणे आंदोलन सुरूच आहे. दोन्ही साखर कारखान्यांकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ऊस वाहतूक रोखण्यात आली आहे. भंडारकवठे येथील ‘लोकमंगल’ समोरील धरणे आंदोलनाला शेतकरी कार्यकर्त्यांचा सहभाग वाढत आहे. रविवारी बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते पंजाबराव पाटील व बी. जी. पाटील यांच्यासह संजय पाटील-घाटणेकर यांनी मार्गदर्शन केले.