पर्जन्यतुटीचे प्रमाण पाहता मराठवाडय़ातील उसाचे पीक शंभर टक्के ठिबक सिंचनावर आणण्याची आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. विभागीय आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना ऊसबंदीची शिफारस असणारा  अहवाल अलीकडेच सादर केला होता. त्याचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये सर्वप्रथम बुधवारी प्रसिद्ध झाले होते.

मराठवाडय़ात उस पीक आणि साखर कारखान्यांवर बंदी घालावी, अशी शिफारस औरंगाबाद विभागीय प्रशासनाने अलीकडे राज्य शासनास केली आहे. या संदर्भात विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, अद्याप आपण या अहवालाचा अभ्यास केलेला नाही. पिण्यासाठी पाणी कमी पडू नये म्हणून अधिक पाणी वापर होणारे ऊस पीक क्षेत्र कमी करावे, अशी सूचना २००७ पासून करण्यात येत आहे. मराठवाडय़ासारख्या भागात उसाचे पीक पूर्णपणे ठिबक सिंचनावर आणले पाहिजे. सूक्ष्म सिंचन ही सध्याची आवश्यकता आहे. ज्या ठिकाणी दहा-दहा वर्षे चांगला पाऊस पडत नाही, तेथे पर्यायी पिकांचाही विचार झाला पाहिजे.

बीड जिल्ह्य़ातील सुमारे १३ हजार ऊसतोड मजूर महिलांची गर्भाशये काढल्याची धक्कादायक माहिती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीच्या तपासात उघडकीस आली आहे. या संदर्भात २९ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्ताबाबत विचारले असता अद्याप आपण हा अहवाल पाहिला नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मराठवाडा वॉटरग्रीडच्या अनुषंगाने परतूरमध्ये १७६ गावांचा पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे. जालना आणि औरंगाबाद जिल्ह्य़ांतील वॉटरग्रीडसाठी चार हजार कोटींच्या निविदा कालच प्रसिद्ध केल्या आहेत. या प्रकल्पाच्या नियोजनात इस्राएलची मदत घेण्यात येत आहे. समृद्धी महामार्गाचे काम ज्या गतीने सुरू आहे, ते पाहता कदाचित २०२० पर्यंत या मार्गावरून प्रवास करता येऊ शकेल. दुष्काळाची तीव्रता मराठवाडय़ात वाढत असून त्या संदर्भात नियोजन करून उपाययोजना केल्या जात आहेत. परतीच्या पावसाचा आढावा घेण्यात येणार आहे.

आपल्या महाजनादेश यात्रेस जनतेचा प्रतिसाद मोठय़ा प्रमाणावर मिळत आहे. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या यात्रांना मात्र प्रतिसाद मिळत नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या संदर्भात विचारले असता ते म्हणाले, आदित्य ठाकरे हे युवा आणि प्रॉमिसिंग नेते आहेत. त्यांच्या यात्रेचे मी स्वागत करतो. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना युतीच्या संदर्भातील प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, संघर्षांचे वर्ष होते तेव्हाही आम्ही सोबत राहिलो. आता तर सत्तेत एकत्र आहोत, त्यामुळे आता हा विषय नाही. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जि. प. अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यावेळी उपस्थित होते.