News Flash

उसावर संकट

‘हुमणी’च्या प्रादुर्भावाने राज्यात दोन लाख हेक्टरवरील पीक धोक्यात

( संग्रहीत छायाचित्र )

|| अशोक तुपे

‘हुमणी’च्या प्रादुर्भावाने राज्यात दोन लाख हेक्टरवरील पीक धोक्यात

वातावरणातील बदलामुळे मध्य महाराष्ट्रातील उसाच्या पिकावर हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे. राज्यातील सुमारे २ लाख हेक्टरवरील उसाचे पीक धोक्यात आले असून अवघ्या ५००  रुपये टनाने चारा म्हणून विक्री सुरू करण्यात आली आहे. नगर जिल्ह्य़ात तर काही भागात उसाच्या फडात नांगर घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

उसाच्या पिकावर कीड व रोग येत नसल्याने व जरी आला तरी त्याच्यामुळे मोठे नुकसान होत नसल्याने शेतकरी कीटकनाशकांचा वापर करीत नाहीत. मात्र २००२-२००३ मध्ये लोकरी मावा आला. त्याचा बीमोड करण्यात आल्यानंतर आता पहिल्यांदाच हुमणीचे संकट ओढावले आहे. मागील वर्षी कपाशीच्या पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. आता हुमणीमुळे राज्यातील २० टक्के उसाचे क्षेत्र धोक्यात आले आहे. त्याचा आगामी गळीत हंगामावरदेखील परिणाम होण्याची शक्यता आहे.

काय आहे हुमणी

देशात हुमणीच्या तीनशे प्रजाती असून त्यातील लिकोफोलिस व होलोट्रॅकिया या दोन प्रजाती राज्यात आढळतात. पण आता फायलोग्याथस आणि अ‍ॅडोरेटस या जातीच्या हुमणीची त्यात भर पडली आहे. हुमणी ही एक कीड आहे. अंडीअळी कोष व भुंगेरा अशा हुमणीच्या चार अवस्था असून अळी अवस्थेत ऊस पिकाचे पूर्वी २० ते ४० टक्क्यापर्यंत नुकसान होत होते; आता ते ८० टक्क्याच्या वर जाऊन पोहोचले आहे. ही बहुभक्षीय कीड असून कडुनिंब व बाभूळ पानावर जगते. अळी ऊस, भुईमूग, हरभरा, सोयाबीन, ज्वारी, आले, कडधान्य अशा पिकांच्या मुळावर उपजीविका करते. ऊस पिकाची मुळे हुमणीने खाल्ल्याने उसाची पाने पिवळी पडून वाळतात. उसाच्या एका बेटाखाली कमाल २० ते जास्तीत जास्त कितीही अळ्या आढळतात.

मध्य महाराष्ट्रातच प्रादुर्भाव

गेल्या बारा वर्षांपासून राज्यात उसाच्या पिकावर हुमणीचा प्रादुर्भाव सुरू झाला. सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात हे प्रमाण सर्वाधिक होते. मात्र यंदा मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, नगर, पुणे तसेच नाशिकच्या काही भागातही हुमणीची कीड वाढली आहे. वातावरणातील बदल त्याला कारणीभूत आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यंदा पाऊस कमी झाला. त्यात खंडही पडला. दोन ते तीन महिन्यांपासून ढगाळ हवामान आहे. सूर्यप्रकाश पिकांना कमी मिळाला. उष्णताही कमी होती. आद्र्रता मात्र वाढलेली होती. दुष्काळी स्थिती, पाण्याचा ताण व हवामानातील बदलामुळे किडीला पोषक वातावरण मिळाले. राज्यात ११ लाख हेक्टर क्षेत्रावर उसाचे पीक घेतले जाते. त्यापैकी सुमारे २ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले असल्याची माहिती पुणे येथील वसंतदादा साखर संस्थेच्या तज्ज्ञांनी दिली. कीड आल्यानंतर तातडीने साखर कारखान्यांच्या ऊस विकास व शेतकी विभागातील तज्ज्ञांना कीड नियंत्रणाचे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले. जैविक कीटकनाशकांचा वापर करून नियंत्रण मिळविता येत असल्याने त्याचा पुरवठाही साखर कारखान्यांना केला. पण किडीचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर असल्याने मागणीप्रमाणे पुरवठा संस्थेला करता आलेला नाही. राज्यातील कृषी विभाग व राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष झाले आहे.

नगर जिल्ह्य़ात सर्वच तालुक्यात उसावर हुमणीचा प्रादुर्भाव झाला. शेतकऱ्यांनी उसाची विक्री सुरू केली आहे. दोन महिन्यांपूर्वी चाऱ्यासाठी उसाला प्रतिटन दोन हजारापेक्षा जास्त दर होता. मात्र कीड आल्यानंतर हे दर कोसळले. शेतकऱ्यांना प्रतिटन पाचशे रुपये दर दिला जात आहे. चारशे रुपये तोडणीचा खर्च, ऊस वाहतूक, विक्री खर्च मिळून हा ऊस बाराशे रुपये टनाने चाऱ्यासाठी विकला जातो. मात्र किडीचा ऊस खाल्ल्याने जनावरे दगावण्याची भीती असते. तसेच ऊस हिरवागार नसतो. तो वाळलेला असतो. त्यामुळे जनावरेही खात नाहीत. या उसाला बाजारात मागणीच नाही, असे सोनई (ता.नेवासे) येथील नवनाथ दारकुंडे व दत्तू खरमाळे या व्यापाऱ्यांनी सांगितले. भाऊराव शेलार, सुनील मुंडपे यांनी हुमणीचा ऊस बाजारात विकत नाही. तोडणी मजूर हे तोडणीसाठी जादा पैसे सांगतात. त्याला घ्यायला शेतकरी नाखूश असतात. ऊस विक्रीचा धंदाच त्यामुळे धोक्यात आला, असे सांगितले.

उसाच्या पिकात नांगर घातला

हुमणीमुळे वंजारवाडी (ता.नेवासे) येथे सुमारे २०० एकर क्षेत्रातील उसाच्या पिकात शेतकऱ्यांनी नांगर फिरवला आहे. कीड वेगाने फैलावत आहे. कपाशीच्या बोंडअळीचे पंचनामे करून भरपाई देण्यात आली. हुमणीमुळे शेतकरी ऊस नांगरून टाकत असताना अद्याप पंचनामे करण्यात आले नाही. उसावर केलेला खर्च वाया गेला असून शेतकरी आणखी कर्जबाजारी होणार आहे.    – महेश डोळे, (वंजारवाडी, ता.नेवासे, जि. नगर)

वातावरण बदलामुळे किडीची वाढ

उसावर हुमणी कीड ही सांगली, कोल्हापूर भागात गेल्या काही वर्षांपासून आली होती. आता संपूर्ण मध्य महाराष्ट्रात ती पसरली आहे. हुमणीच्या संकटातून बाहेर पडण्याकरिता एकात्मिक कीड नियंत्रणाची गरज आहे. वातावरणातील बदलामुळे आता उसासारखे कमी रोग येणारे पीकही कीड व रोगाला बळी पडू लागले आहेत.   – आर.जी.यादव, प्रमुख, कीटकशास्त्र  विभाग, वसंतदादा साखर संस्था, पुणे.

द्रवरुप जैविक किडनियंत्रण

वसंतदादा साखर संस्थेने मेटारायझम, बिव्हेरिया, व्हर्टिसिलियम लेकॅनी या बुरशी व बॅसिलस थुरिंजिसीस या जिवाणूंपासून वसंतदादा साखर संस्थेने जैविक कीडनाशक तयार केले असून हुमणी नियंत्रणासाठी त्याचा चांगला वापर होतो. चालू वर्षी २२ हजार लिटर औषध विकण्यात आले. अजूनही १६ हजार लिटरची मागणी साखर कारखान्यांनी नोंदविली आहे. प्रादुर्भाव वाढल्याने पुरवठा टप्प्याटप्प्याने करावा लागत आहे.    – बी.जी.माळी, संशोधन अधिकारी, कृषी सूक्ष्म जीवशास्त्र विभाग, वसंतदादा साखर संस्था, पुणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 12:58 am

Web Title: sugarcane production in maharashtra 2
Next Stories
1 कोकणात भाजपचा भरवसा आयारामांवर!
2 पाच कोटींचे स्वस्त धान्य अधिकाऱ्यांसह दलालांनी पचविले
3 चंद्रपूर वीज केंद्राचा १७५ कोटींचा प्रकल्प रखडला
Just Now!
X