करोना संकटाच्या काळात आशा कर्मचारी व गटप्रवर्तक जीवावर उदार होत कार्य करीत आहेत.त्यांना या काळात प्रोत्साहन भत्ता मिळावा, अशी मागणी असल्याने त्यावर विधानसभेत लक्षवेधी सूचना उपस्थित करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार डॉ.पंकज भोयर यांनी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स संलग्नित जिल्हा आशा गटप्रवर्तक कर्मचारी युनियनच्या शिष्टमंडळाला दिले.
आज वर्धा येथे युनियनने आमदार डॉ.पंकज भोयर यांना दिलेल्या निवेदनातून अनेक बाबींचा उहापोह केला आहे. युनियनने निवेदनात नमूद केले की,राज्यात 7 हजार 200 आशा कर्मचारी व 3 हजार 500 पेक्षा अधिक गटप्रर्वतक महिला राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत कार्य करीत आहेत. शहरी भागापासून तर गाव खेडयात ते आरोग्य अभियान पोहचविण्याचे कार्य करतात. पण आशा कर्मचारी यांना नियमित स्वरूपाचे ठराविक वेतन अथवा मानधन दिल्या जात नाही.सरकारने त्यांना कायदेशीर कामगार म्हणून मान्यता दिली नाही.आजघडीला त्यांच्याकडून 73 पद्धतीची कामे आरोग्य विभाग करून घेत आहे. यामध्ये प्रत्येक गावातील सर्वेक्षण, गरोदर मातांना आरोग्य केंद्रात घेवून जाणे, शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील मानसिक आजारांचे सर्वेक्षण करणे,लसीकरण, गाव आरोग्य समितीचे कामकाज, हत्तीरोग, कॅन्सर, टी.बी., मलेरीया, डेंग्यूसह अन्य आजाराचे सर्वेक्षण त्यांच्याकडून करण्यात येते. शिवाय, कोविड 19 च्या सर्वेक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
आणखी वाचा- सिटी बँकेतील निवृत्त कर्मचारी पेन्शनपासून वंचित; मुख्यमंत्र्यांना घातलं साकडं
अनेक महत्वपुर्ण कामांची जबाबदारी सांभाळत असताना त्यांना केवळ 2500 ते 3000 रूपये मिळतात. एक दशकापासून काम करून देखील मिळणारी रक्कम फारच कमी असून त्यांचे आर्थिक शोषण करणारी ठरत आहे. अन्य राज्यात त्यांना महाराष्ट्राच्या तुलनेत अधिक वेतन देण्यात येते. राज्य शासनाने केंद्र सरकारप्रमाणे आपली भागीदारी जोडून मानधन दयावे, यासाठी युनियनचा सतत पाठपुरावा सुरू आहे. सप्टेंबर 2019 मध्ये 15 दिवसांचा संप केल्यानंतर राज्य सरकारने 2000 रूपयांची वाढ करणारा आदेश काढला. पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. आशा कर्मचारी यांना अंगणवाडी सेविकांच्या बरोबरीने वेतन देण्यात यावे, लॉकडाऊन काळात एक हजार रूपये प्रोत्साहन भत्ता, शासकीय कर्मचा-यांचा दर्जा, यासह अन्य मागण्याचे निवेदन युनियनच्या अध्यक्ष अलका जराते, सचिव अर्चना घुगरे, गटप्रर्वतक मिनाक्षी गायकवाड, भैय्याजी देशकर यांनी दिले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 10, 2020 4:00 pm