अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिके हातची गेल्यानंतर कर्जबाजारी झालेल्या जिल्ह्यातील २८ शेतकऱ्यांनी मागील ६ महिन्यांत मृत्यूला कवटाळले. मात्र, सरकारच्या निकषांमध्ये केवळ सातच शेतकरी आर्थिक मदतीस पात्र ठरले. उर्वरित १९ शेतकऱ्यांचे वारसदार वंचित आहेत. दोन प्रकरणांची चौकशी सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली.
चालू वर्षांत फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकरी हैराण झाला. सततच्या गारपिटीमुळे रब्बी पिके हातून गेली. फळबागाही उद्ध्वस्त झाल्या. शेतकऱ्यांवर कर्जबाजारीपणाचे संकट ओढवले. कर्जाला कंटाळून जिल्ह्यात ६ महिन्यांमध्ये तब्बल २८ शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला. जानेवारीमध्ये भूम व तुळजापूर तालुक्यात प्रत्येकी १, फेब्रुवारीत कळंबमध्ये १, तर भूममध्ये २ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मार्चमध्ये भूम तालुक्यात २, कळंबमध्ये ४, उस्मानाबादेत २, तुळजापूरला ५, तर उमरग्यात १ अशा १४ आत्महत्या केवळ एकाच महिन्यात झाल्या. एप्रिलमध्ये कळंब, उस्मानाबाद व भूम तालुक्यांत प्रत्येकी एका शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविली. मेमध्ये उस्मानाबाद तालुक्यात ३, तर भूम तालुक्यात १ शेतकऱ्याने आत्महत्या केली. जूनमध्ये कळंब व भूम तालुक्यांत प्रत्येकी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली.
मागील ६ महिन्यांत जिल्ह्यात २८ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणास कंटाळून आत्महत्या केल्या. मात्र, सरकारची आर्थिक मदत केवळ ७ शेतकऱ्यांच्या वारसांना मिळाली. उर्वरित १९ शेतकरी कुटुंबे अनुदानापासून वंचित आहेत. दोन शेतकऱ्यांच्या वारसांचे प्रस्ताव चौकशीसाठी प्रलंबित असल्याचे समजते. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसदारांना सरकारकडून प्रत्येकी एक लाखाची मदत वाटप करण्यात आली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे कर्जाची नोंद नसणे, आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या नावे शेतजमीन नसणे आदी विविध कारणांवरून आत्महत्या केलेल्या १९ शेतकऱ्यांचे वारसदार मदतीला मुकले आहेत.
वीज पडून २० जण ठार
जानेवारी ते जुलच्या आरंभापर्यंत जिल्ह्यात वीज कोसळून २० जणांचा मृत्यू झाला. पकी १९ जणांच्या वारसदारांना सरकारच्या मदतीचे वाटप करण्यात आले. जानेवारी ते मे दरम्यान वीज कोसळून १६ जणांचा मृत्यू झाला. जून ते जुलच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला. वीज कोसळून २० जणांचा मृत्यू झाला. पकी १९ जणांना प्रत्येकी दीड लाख रुपये मदतीचे वाटप करण्यात आले. केवळ एकाच व्यक्तीच्या वारसदारांना मदतीचे वाटप होणे बाकी आहे.