लोहारा तालुक्यातील आरणी येथील एका तरुण शेतकऱ्याने नापिकीला व कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. सूर्यकांत सिद्राम सोमवंशी (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.  
 एकाच महिन्यात तीन शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सिद्राम यांना वडिलोपार्जति ४ एकर शेती आहे. सिद्राम हे पत्नी, आई, मुलगा, मुलगी व लहान भाऊ व त्यांच्या मुलांसह राहतात. या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. मागील चार वर्षांपासून शेतीत उत्पन्न मिळत नसल्याने आíथक स्थिती खूपच नाजूक झाली. कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थित होत नसल्याने त्यांचे भाऊ हिराकांत आपल्या मुलाबाळांसह कामाच्या शोधात तुळजापूरला गेले. गतवर्षी शेतात बराच पसा खर्चूनही उत्पन्न मिळाले नाही. यंदाही खरिपात पेरणी करूनही निसर्गाने साथ न दिल्यामुळे उत्पन्नाचा स्रोत बंद झाला. अनेक वेळा खासगी सावकाराकडून कर्ज काढून शेतात व प्रपंचात पसा खर्च केला. त्यातच घरात उपवर झालेल्या मुलीच्या लग्नाची चिंता त्यांना सतावू लागली. मागील चार महिन्यांपासून सूर्यकांत हे अस्वस्थ होते. त्यांनी जवळच्या मित्रांनाही ही अस्वस्थता बोलून दाखविली होती. अनेकांनी त्यांना धीर दिला होता. परंतु उपवर मुलीच्या लग्नाची चिंता सतावू लागली. लग्नासाठी पसे नाहीत. सावकाराच्या कर्जाचे व्याज वाढत चालले. शिवाय सावकाराचा पशासाठी तगादा लावलेला. शेतीचे उत्पन्न नाही. या चिंतेने सूर्यकांत ग्रासून गेले होते. अखेर त्यांनी बुधवारी पहाटेच्या सुमारास राहत्या घरासमोरील झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. या अगोदर लोहारा शहरातील यल्लोरे व मोघा येथील जाधव या शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती. एकाच महिन्यातील ही तिसरी घटना घडली होती. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.