तरुण सराफा व्यापारी रवी टेहरे याच्या आत्महत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी सखाराम टेकुळे व रेल्वे पोलीस अधिकारी चिंचाणे या दोघांविरुद्ध शुक्रवारी रात्री पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
परभणी तालुक्यातील वाघाळा येथील रवी गणेश टेहरे याचे पाथरी शहरात सोन्या-चांदीचे दुकान आहे. मागील काही दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखेचा कर्मचारी टेकुळे व रेल्वे पोलीस अधिकारी चिंचाणे हे दोघे रवीला धमकावत होते. चोरीचे खरेदी केलेले दागिने आम्हाला दे, अन्यथा तुला गुन्ह्यात अडकवू, अशी ही धमकी होती. या त्रासाला कंटाळून रवीने गेल्या सोमवारी रात्री घरी विष प्राशन केले. मंगळवारी पहाटे जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्याने टेकुळे व चिंचाणे या दोघांच्या त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली. या प्रकरणी पाथरी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र, आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी जिल्ह्य़ातील सर्व सराफा व्यापाऱ्यांनी एक दिवस आपली दुकाने बंद ठेवून घटनेचा निषेध केला. सराफा संघटनेने पोलीस अधीक्षकांचीही भेट घेतली. अखेर शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता रवीचे वडील गणेश टेहरे यांच्या तक्रारीवरून टेकुळे व चिंचाणे या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.