मनसेचे माजी जिल्हा संघटक व इचलकरंजी येथील यंत्रमागधारक रघुनाथ मेटे यांनी रविवारी दुपारी विष प्राशन करून आत्महत्या केली. तीन दिवसापूर्वी त्यांनी १ लाख रुपयाची खंडणी मागणारा फोन आल्याने संरक्षण मिळावे, अशी मागणी गावभाग पोलिसांकडे केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिपत्याखाली चालणाऱ्या राष्ट्रवादी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष विश्वनाथ मेटे यांचे ते बंधू होते. रघुनाथ मेटे हे सामाजिक कार्यकत्रे होते. शासकीय खात्यांमध्ये चालणारे गरव्यवहार त्यांनी उघडकीस आणले होते. त्यातून त्यांची कारकीर्द वादग्रस्तही ठरली होती. मनसेची स्थापना झाल्यानंतर पहिल्या फळीमध्ये जे पदाधिकारी निवडले गेले त्यामध्ये मेटे यांचा समावेश होता. पक्षाचे संघटक म्हणून त्यांनी काम पाहिले होते. पक्षांतर्गत वाद व कुरघोडीतून त्यांना पद गमवावे लागले होते. तेव्हापासून त्यांचा मनसेशी संबंध उरला नव्हता. ते यंत्रमागाचा व्यवसाय करीत होते. इचलकरंजीतील गणेशनगरातील गल्ली क्र. ९ मध्ये रहात होते. गेल्या आठवडय़ात मेटे हे पुन्हा एकदा चच्रेत आले होते. १ लाख रुपयाची खंडणी मागणारा अज्ञाताचा भ्रमणध्वनी त्यांना आला होता. भ्रमणध्वनीचा क्रमांक त्यांनी गावभाग पोलिसांना दिला होता. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी गावभाग पोलिसांकडे केली होती. हे प्रकरण ताजे असतानाच रविवारी दुपारी मेटे यांनी आत्महत्या केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. व्हॉटस्अप, फेसबुकवरून याबाबतची उलटसुलट चर्चा सुरू झाली. दरम्यान, विश्वनाथ मेटे हे सायंकाळी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गेले होते. तेथे त्यांनी रघुनाथ मेटे हे दुपारपासून घराबाहेर पडल्याची माहिती पोलिसांना दिली होती. उपलब्ध माहितीनुसार रघुनाथ मेटे यांनी दारूच्या बाटलीमध्ये विष मिसळून ते प्राशन केले.