मुंबई पोलीस दलात गेल्या वर्षी भरती झालेले नवप्रविष्ट प्रशिक्षणार्थी पोलीस शिपाई गणेश जगन्नाथ थोरवे यांनी सोलापूरच्या महिला पोलीस प्रशिक्षण केंद्रात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेचे निश्चित कारण लगेचच समजू शकले नाही.
थोरवे हे गेल्या २८ ऑगस्ट २०१४ रोजी मुंबई पोलीस दलात शिपाईपदावर भरती झाले होते. नंतर त्यांना आवश्यक प्रशिक्षणासाठी सोलापूरच्या महिला पोलीस प्रशिक्षण केंद्रात पाठविण्यात आले होते. गेल्या १७ नोव्हेंबरपासून ते पुणे रस्त्यावरील केगाव येथील महिला पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत होते. थोरवे हे मूळचे सातारा जिल्ह्य़ातील राहणारे होते. सोमवारी सकाळी त्यांनी प्रशिक्षण केंद्रातच स्वत:ला गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. थोरवे यांन गेल्या काही दिवसांपासून ‘नागीण’ नावाचा त्वचा आजार झाला होता. हा आजार आटोक्यात येत नसल्याने ते संत्रस्त होऊन त्यांची मानसिक स्थिती ढासळली होती. त्यातूनच त्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला असावा, असा प्राथिमिक अंदाज पोलीस व्यक्त करीत आहेत. या घटनेचा अधिक तपास फौजदार चावडी पोलीस करीत आहेत.
अपघातात दोघा भावांचा मृत्यू
सोलापूर-अक्कलकोट रस्त्यावर वळसंग येथे एका भरधाव टँकरने ठोकरल्याने घडलेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोघा बंधूंचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला. सादिक बंदेअली शेख (२६) व सैफन बंदेअली शेख (३२, रा. कॉ. गोदूताई परूळेकर विडी घरकुल, कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर) अशी मृत भावांची नावे आहेत.  हे दोघे जण मोटारसायकलवरून कुंभारी विडी घरकुल येथून अक्कलकोट येथे निघाले होते. वाटेत वळसंग येथे स्वामी समर्थ सहकारी सूतगिरणीसमोर त्यांना टँकरची धडक बसली. वडील बंदेअली शेख यांनी दोघांना गंभीर जखमी अवस्थेत छत्रपती शिवाजी सवरेपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच दोघा भावांचा मृत्यू झाला. एकाचवेळी दोन्ही तरुण मुले मृत्यमुखी पडल्याचे पाहून वडील बंदेअली शेख यांना धक्का बसला. मृत मुलांपैकी सादिक हा मोलमजुरी करीत होता, तर सैफन हा वाहनचालक होता. दोघांचेही विवाह झाले होते. अक्कलकोट येथे नोटरीकडे दस्त नोंद करण्यासाठी दोघे बंधू निघाले असता वाटेत त्यांच्यावर काळाने झडप घातली.