शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार जयंत ससाणे यांचे थोरले बंधू संजय मुरलीधर ससाणे (वय ६१) यांनी बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली. शनिवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आजारामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे कुटूंबियांचे म्हणणे आहे. त्यांच्या मागे आई रत्नमाला, पत्नी रंजना, मुलगा समीर, मुलगी स्नेहा, स्नुषा गीता, कनिष्ठ बंधू सुनील व भावजई नगराध्यक्षा राजश्री असा परिवार आहे.
मोरगेवस्ती भागातील निवारा वसाहतीत ससाणे यांचा बंगला आहे. ते दररोज पहाटे चार वाजता फिरायला जाऊन पाच वाजता घरी येतात. त्यांचे चिरंजीव समीर हे सव्वापाच वाजता उठले असता त्यांना वडील संजय ससाणे हे घरी आलेले दिसले नाही. त्यामुळे त्यांनी आई रंजना यांच्याकडे विचारणा केली. घराबाहेर आले असता समोरच अवघ्या वीस फुटावर झुडूपात ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांच्या मृतदेहाजवळ बंदूक पडलेली होती. त्यांनी स्वत:च्या परवाना असलेल्या बारा बोअरच्या बंदुकीतून गोळी झाडून घेतलेली होती. हा प्रकार बघून त्यांनी रखवालदार शिवा सपनार यास उठविले व त्वरीत शेजारीच असलेल्या संजीवनी रुग्णालयात दाखल केले. या प्रकाराची माहिती त्वरित माजी आमदार जयंत ससाणे यांना दिली. ते रुग्णालयात दाखल झाले. सकाळी फिरणाऱ्या प्रभात मंडळाच्या कार्यकर्त्यांना ससाणे यांनी रुग्णालयात जातांना ही माहिती दिली. यावेळी रमण मुथ्था, निलेश भालेराव, संजय गोसावी, संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, सुनील बोलके, जनार्दन नागले, सुभाष चव्हाण, रमेश चंदन, मुन्ना झंवर आदी रुग्णालयात दाखल झाले. पण उपचारापूर्वीच संजय ससाणे यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच मोठा जनसमुदाय रुग्णालय परिसरात जमा झाला. या घटनेने माजी आमदार ससाणे यांना मोठा धक्का बसला. त्यांना लोकांनी सावरले व सांत्वन केले.
मयत ससाणे यांनी स्वत: शरीराच्या छातीजवळ डाव्या बाजुला गोळी झाडली होती. गोळीचे र्छे सर्व शरीरात गेले. हृदयाला त्यामुळे छिद्र पडले. तसेच फुफ्फुसालाही जखमा झाल्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली. शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप आला नाही. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदविण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पगार हे अधीक तपास करीत आहेत. दोन महिन्यापासून ते आजारी होते. त्यांच्या मेंदूकडे जाणारी एक नस बारीक झाली होती. मुंबई येथील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांना नैराश्य आले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे पगार यांनी सांगितले. त्यांच्या मृतदेहाजवळ चप्पल, घडय़ाळ तसेच बंदुक पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. आत्महत्येच्यावेळी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपलब्ध नाही. प्राथमिक चौकशीत हा घातपाताचा प्रकार नसल्याचे पगार यांनी सांगितले.
दुपारी तीन वाजता येथील अमरधाममध्ये त्यांच्यावर हजारो लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, अभय आगरकर, अविनाश आदिक, माजी खासदार प्रसाद तनपुरे, चंद्रशेखर कदम, सचिन गुजर, माजी आमदार पांडुरंग अभंग आदींनी श्रध्दांजली वाहिली.
मार्गदर्शक व सूत्रधार
मयत संजय ससाणे हे माजी आमदार ससाणे यांचे राजकीय मार्गदर्शक होते. ते कुशल व्यवस्थापक होते. काँग्रेसच्या संघटनेची व्यूहरचना ते पडद्याआडून करीत. कार्यकर्त्यांना न्याय व आधार देण्याचे काम ते करीत असत. ससाणे कुटुंबीयांचेही ते प्रमुख होते. काँग्रेस पक्ष संघटनेत महत्वाचे निर्णय त्यांच्या सल्ल्यानेच घेतले जात. शिस्तप्रिय व संयमी असलेल्या त्यांच्या निधनाने लोक हेलावले.