बेकायदेशीरपणे केलेल्या पक्कय़ा बांधकामाविरोधातील कारवाई रोखण्यासाठी रमेश खळे या माजी नगरसेवकांनी त्या बांधकामावरून उडी टाकून आत्महत्येची स्टंटबाजी करण्याचा प्रकार मंगळवारी येथे घडला.

खळे यांचा शिवनदीलगत हातगाडीवर वडापाव विक्रीचा व्यवसाय होता. त्या ठिकाणी त्यांनी पत्र्याची कायमस्वरूपी शेड बेकायदेशीरपणे बांधून ‘प्रेमाचा चहा’ या नवीन व्यवसायाला सुरवात केली. आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे आदींच्या उपस्थितीत या नव्या बेकायदा व्यवसायाचे सोमवारी उद्घाटन झाले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, मंगळवारी पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक तेथे कारवाईसाठी गेले. या वेळी खळे यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि दुकानाच्या पत्र्यावर चढून आत्महत्या करण्याचा इशारा देत पोलीस व पालिकेच्या कर्मचाऱ्यांना धमकावले. शहराला वीज पुरवठा करणारी ३३ केव्हीची वाहिनी जवळून जात असल्यामुळे महावितरणशी संपर्क साधून तत्काळ वीज पुरवठा बंद करण्यात आला. वीज पुरवठा बंद झाल्याने व्यापाऱ्यांची गैरसोय झाली. त्यामुळे अर्ध्या तासाने पुन्हा वीज पुरवठा सुरू करण्यात आला.

नगरसेवक आशिष खातू, प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, अनंत मोरे आदींनी खळे यांना पत्र्यावरून खाली उतरण्याची विनंती केली. मात्र त्यांनी कोणाचेच ऐकले नाही. मेलो तरी चालेल, पण खाली उतरणार नाही. या भूमिकेवर ते ठाम राहिले. त्यामुळे पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने तेथील कारवाई थांबवून भोगाळे परिसरात कारवाई सुरू केली. त्यानंतरही खळे दुकानाच्या पत्र्यावर उशिरापर्यंत उभे होते. खळे यांनी पोलीस आणि पालिकेला एक प्रकारे आव्हान दिल्यामुळे प्रशासन त्यांच्या विरोधात कोणती कारवाई करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मी व्यवसाय सुरू केलेली जागा खासगी मालकीची जागा आहे. त्या जागामालकाला त्याचे भाडे देतो. तरीही मला लक्ष्य केले जात आहे. शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे आहेत. ती न तोडता माझ्याच स्टॉलवर जाणीवपूर्वक कारवाईचा प्रयत्न  झाला. त्यामुळे मी आत्महत्या करण्याचा पाऊ ल उचलले, अशी भूमिका खळे यांनी मांडली, तर नदीच्या संरक्षक कठडय़ावरच खळे यांनी पत्र्याचे कायमस्वरूपी पक्के बांधकाम करून दुकान सुरू केले आहे. शिवनदी लगतची जागा हरित पट्टय़ामध्ये आहे. त्यांनी या आधी तेथे हातगाडीवर पडापाव विक्रीचा व्यवसाय सुरू केला, त्याकडे पालिकेने दुलक्र्ष केले. आता पुढे जाऊन पक्के बांधकाम केले आहे. त्यांना सवलत दिली तर शहरात अनधिकृत बांधकाम फोफावतील. म्हणून कारवाईसाठी जावे लागले, असे स्पष्टीकरण पालिकेचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद  ठसाले यांनी दिले.

शहरातील अनधिकृत खोक्यांवर पालिका प्रशासनाने चुकीच्या वेळी कारवाई केली. मी खोकेधारकांच्या पाठीशी आहे, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी देत या खोकेधारकांना त्यांचे खोके हटवण्यासाठी प्रशासनाने १५ दिवसांची मुदत द्यावी, अशी सूचना केली.