कर्जबाजारी झालेल्या एका बारचालकाने आपली पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सायंकाळी आठच्या सुमारास उजेडात आला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

जुना पुणे चौत्रा नाका परिसरातील हांडे प्लॉटमध्ये राजपूत यांच्या घरात भाड्याने राहणाऱ्या एका बारचालकाने कर्जबाजारीपणाला वैतागून आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या केली. करोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या टाळेबंदीचा मोठा फटका बार व्यवसायाला बसल्यामुळे या आत्महत्याग्रस्त बारचालकाची आर्थिक कुचंबणा झाली होती.

त्यातच कर्जाचा वाढलेला डोंगर हलका न होता वाढून असह्य होऊ लागल्यामुळे त्याने पत्नी आणि दोन्ही मुलांसह आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

अमोल जगताप (वय ३५) असे बारचालकाचे नाव आहे. त्याची पत्नी मयुरी (वय २८) आणि मुले आदित्य (वय ७) आणि आयुषी (वय साडेचार वर्षे) अशी मृत्यू झालेल्या कुटुंबीयांची नावे आहेत. दरम्यान, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. यासंदर्भात चावडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.