News Flash

सुजय विखे भाजपात, जाणून घ्या अहमदनगरच्या राजकारणावरील परिणाम

सुजय विखे हे मागील दोन वर्षांपासून कर्जत जामखेड मतदारसंघांमध्ये प्रत्येक गाव आणि वाडी वस्तीवर जाऊन स्वत:चा गट निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत.

सुजय विखे भाजपात, जाणून घ्या अहमदनगरच्या राजकारणावरील परिणाम
सुजय विखे-पाटील

अहमदनगर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसने न सोडल्यामुळे नाराज झालेल्या सुजय विखे-पाटील यांनी अखेर मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. सुजय विखे यांच्या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढणार असून जिल्ह्यातील राजकीय समीकरणावर याचा काय परिणाम होईल, याचा ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा…

पारनेरमध्ये काँग्रेस संपुष्टात
डॉ. सुजय विखे यांनी काँग्रेसला राम राम ठोकत भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे पारनेर तालुक्यातील काँग्रेस पक्ष संपुष्टात आला आहे. मात्र जोपर्यंत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे काँग्रेसमधे आहेत, तोपर्यंत पारनेर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह इतर संस्थांचे पदाधिकारी, तालुका काँग्रेसचे पदाधिकारी तांत्रिकदृष्टय़ा काँग्रेस पक्षातच राहणार असल्याचे चित्र आहे.

तालुक्यातील काँग्रेस पक्षात विखे परिवार आणि माजी आमदार नंदकुमार झावरे यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे तालुक्यातील काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणुकीत डॉ. विखे पर्यायाने भारतीय जनता पक्षाबरोबर राहणार हे स्पष्ट आहे.

काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य व पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. भास्करराव शिरोळे, बाजार समितीचे सभापती विलास झावरे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी डॉ. विखे यांच्या भाजप प्रवेशाच्या वेळी उपस्थित होते. ही बाब लोकसभा निवडणुकीत तालुक्यात काँग्रेसची नेमकी काय परिस्थीती असेल हे स्पष्ट करण्यास पुरेशी आहे.

माजी आमदार झावरे यांचे चिरंजीव राहुल झावरे काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य असले, तरी शिवसेनेच्या पाठिंब्यावर ते पंचायत समितीचे सभापती आहेत आणि लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती असल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचा धर्म पाळला नाही तरी त्यांच्या पदाला धोका नाही. अर्थातच विखेंनी जंग जंग पछाडूनही
राष्ट्रवादीने नगर दक्षिणेची जागा काँग्रेसला सोडली नाही, त्यामुळे संतप्त विखे समर्थक काँग्रेस आघाडीचा धर्म पाळण्याची सुतराम शक्यता नाही आणि तो पाळण्याचे ठोस कारणही नाही. काँग्रेसचे निघोज गणातील पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर हे देखील कट्टर विखे समर्थक आहेत. वेळ पडल्यास पंचायत समिती सदस्यत्वावर ते पाणी सोडतील पण विखेंची साथ सोडणार नाहीत. एकूणच तालुक्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी विखेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचे स्पष्ट आहे.

डॉ. विखे यांच्या भाजपा प्रवेशाच्या वेळी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य (कै.) अण्णा पाटील शिंदे यांचे चिरंजीव व दूध संघाचे अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष डॉ. बबनराव सोबले यांचे चिरंजीव डॉ. विनायक सोबले, तालीम संघाचे अध्यक्ष युवराज पठारे, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष शैलेंद्र औटी आदी उपस्थित होते.

डॉ. विखे यांच्या भाजप प्रवेशाच्या वेळी मुंबई उपस्थित असलेले तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.भास्करराव शिरोळे यांनी जोपर्यंत विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे काँग्रेसमधे आहेत, तो पर्यंत आम्हीही काँग्रेस सोबत असल्याचे सांगितले तर सभापती राहुल झावरे यांनी आपण आपली भूमिका उद्या (बुधवार) स्पष्ट करणार असे सांगितले.

कोपरगावची राजकीय समीकरणे बदलणार

डॉ. सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केल्याने आगामी काळात कोपरगावच्या राजकारणातही राजकीय समीकरणे बदलणार आहेत. आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर आता कोल्हे परजणे विखे युतीचे राजकारण उदयास येणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या आमदार म्हणून स्नेहलता कोल्हे या नरेंद्र मोदी लाटेत पहिल्या आमदार झाल्या. कै. नामदेवराव अण्णा परजणे यांचे कोल्हे यांचेशी राजकारणातून वितुष्ट आले होते. त्याचा परिणाम दूध संघावर झाला होता. तदनंतर कै. बाळासाहेब विखे व विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांनी कोपरगांववर लक्ष केंद्रित करून युवा नेते व जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांचे मागे खंबीरपणे उभे राहत गोदावरी दूध संघाला पुन्हा ऊर्जितावस्थेत आणले.

जिल्हा परिषद, पंचायत समितीत काळे-परजणे युती आहे. बाजार समितीत शेतकरी हितासाठी काळे-परजणे-कोल्हे एकत्र आहेत. युवक नेते राजेश परजणे यांना नेहमी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे व जिल्हा परिषद अघ्यक्ष शालिनी विखे यांचे सतत मार्गदशन व पाठबळ मिळत आल्याने ते कोपरगावच्या राजकारणात सतत सक्रिय असतात. विखे यांनी जिल्हाभरात तालुका विकास आघाडय़ा निर्माण करून ठेवलेल्या असल्याने त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा मोठा संग्रह आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत या आघाडय़ांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी काळात मोठी डोकेदुखी होण्याची शक्यता आहे.

कर्जतला भाजपमध्ये सावधगिरी, काँग्रेसमध्ये नैराश्य
कर्जत जामखेड मतदारसंघात नवीन समीकरणे निर्माण होणार आहे. विखे यांच्या भाजप प्रवेशाने त्यांचे समर्थक आनंदी झाले आहेत, विखे हे मागील दोन वर्षांपासून या मतदारसंघात सक्रिय झाले होते मात्र ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असल्याने ही जागा राष्ट्रवादी , काँग्रेस पक्षाला देणार का, की सुजय विखे राष्ट्रवादीच्या चिन्हावर उभे राहणार की अपक्ष लढणार की शेवटी कमळ हातामध्ये घेणार याविषयी तर्कवितर्क लढवले जात होते मात्र आज अखेर या सर्व गोष्टींवर पडदा पडला आहे यामुळे विखे समर्थकांमध्ये कमालीचा उत्साह संचारलेला दिसून येत आहे तर दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते मात्र सावध प्रतिक्रिया देत असताना काँग्रेस आघाडीचे कार्यकर्ते मात्र निराश झाले असल्याचे दिसून आले, शिवसेना मात्र तटस्थ असल्याचे दिसून येत आहे.

सुजय विखे यांनी भाजपमध्ये केलेल्या प्रवेशाला दिलीप गांधी यांच्या समर्थकांनी विरोध केल्यावरही त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला आहे यामुळे या दोन्हीही तालुक्यातील नाराज झाले आहेत, कर्जत येथील बापूसाहेब चव्हाण यांनी सांगितले की, खासदार दिलीप गांधी यांना उत्कृष्ट संसद पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे ,त्यांचे काम चांगले आहे, असे असताना त्यांना डावलून अन्याय केला आहे, या मुळे खासदार दिलीप गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांना नगर दक्षिणमधून उमेदवार द्यावी. भारतीय जनता पक्षातील सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व काँग्रेसमधील कार्यकर्ते असे एकत्रित येऊन नगर दक्षिणमधून दिलीप गांधी यांना विजय करतील असा आम्हाला विश्वास आहे.

कर्जतमध्ये भाजपची ताकद वाढली
सुजय विखे हे मागील दोन वर्षांपासून कर्जत जामखेड मतदारसंघांमध्ये प्रत्येक गाव आणि वाडी वस्तीवर जाऊन स्वत:चा गट निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांनी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गोरगरीब जनतेपर्यंत स्वत:चे नाव आणि सामाजिक कार्य पोहोचवले आहे याशिवाय बचत गटाच्या माध्यमातून महिलांची मोठी चळवळ केली आहे यामुळे या सर्व बाबींचा फायदा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनाला भविष्य काळामध्ये होईल. त्यांच्या व्यासपीठावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बहुसंख्य नेते दिसून येत असत मात्र आता जरी त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला असला तरीही यातील बहुसंख्य मंडळी वैयक्तिक जोडले गेल्यामुळे त्यांच्या सोबत राहतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2019 5:49 am

Web Title: sujay vikhe patil join bjp impact on ahmednagar politics bjp strength increases set back to congress
Next Stories
1 एकमेकांना डसलो तरी फरक नाही पडणार, राष्ट्रवादीचा ‘युती’वर निशाणा
2 पालघर जिल्ह्यात १८ लाख मतदार
3 मद्याच्या तस्करीवर उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर
Just Now!
X