लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची टीका

पुणे : जे व्हायला नको ते दिल्लीमध्ये घडत आहे. कोणतीच संस्था आम्ही शुद्ध ठेवू देणार नाही असा पण काही लोकांनी केला असल्याचे दिसून येते, अशा शब्दांत लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी राजकीय सद्यस्थितीवर शुक्रवारी भाष्य केले. दिल्लीत काय चाललं आहे ते आम्ही पाहून घेऊ. लोकसभा अध्यक्ष या नात्याने कोणताही विषय शेवटी माझ्याकडेच येत असतो. लोकांच्या आशीर्वादाच्या जोरावर ही वादळं पार करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

श्रुतिसागर आश्रमातर्फे आदि शंकराचार्य जयंतीनिमित्त महाजन यांच्या हस्ते कर्नाटकातील श्री माणिकप्रभू संस्थानचे पीठाधीपती ज्ञानराज माणिकप्रभू महाराज यांना आदि शंकराचार्य पुरस्कार आणि गोकर्ण महाबळेश्वर येथील वेदमूर्ती श्रीधर आडी यांना वेदसंवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आला. महापौर मुक्ता टिळक, श्रुंगेरी पीठाचे शंकराचार्य श्रीविद्याभिनव शंकर भारती, स्वामी स्वरूपानंद सरस्वती, माताजी स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती, त्रिपदी परिवाराचे डॉ. बाबासाहेब तराणेकर, अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एस. टी. देशमुख आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. मो. स. गोसावी या वेळी उपस्थित होते. ‘योगवासिष्ठ-प्रथम वैराग्य प्रकरणा’चे प्रकाशन महाजन यांच्या हस्ते झाले.

दिल्लीमध्ये आणि देशभरात वादळं येत आहेत. वादळं येतील. ती येत राहणारच. पण, वादळं आलीच नाहीत तर, खंबीरपणे उभे रहायला कसे शिकणार? या वादळांना पार करून आपल्याला भारताला मोठे करावे लागेल, अशी अपेक्षा महाजन यांनी व्यक्त केली.

आपला सत्कार हा गुरु परंपरेचा सन्मान आहे. अद्वैताचे प्रबोधन हेच आमचे काम आहे. त्याला पुरस्कार देण्यायोग्य समजले गेले हा बहुमान आहे, अशी भावना माणिकप्रभू महाराज यांनी व्यक्त केली.

सुमित्राताईंमध्ये परमेश्वराचे रूप

दूरचित्रवाणीवर सुमित्राताई महाजन यांना पाहिल्यानंतर त्यांच्यामध्ये परमेश्वराचे रूप दिसते. ‘मूकं करोति वाचालम्’ असे आपण म्हणतो तेव्हा मूक व्यक्तीला बोलता करण्याची शक्ती परमेश्वर देतो हा अर्थ आपण जाणतो. पण, लोकसभेतील सगळ्या वाचाळांना मूक करण्याचे सामर्थ्य सुमित्राताई यांच्याकडे आहे, अशी टिप्पणी माणिकप्रभू महाराज यांनी केली. त्यावर ‘मूकं करोति वाचालम्’चा नवा अर्थ आज मला उलगडला, असे सुमित्रा महाजन यांनी सांगितले.