अहिल्यादेवी स्त्री शक्ती राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा

सरकारची जबाबदारी ही शेती व्यवस्था सांभाळण्याची, धोरण आखण्याची आहे. प्रत्येकवेळी शेतमाल खरेदी करण्याचे काम हे सरकारचे नाही. सरकार दुकानदार होऊ शकणार नाही. शेतकऱ्यांना आता शेतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर, शेतमाल प्रक्रिया याविषयी अधिक ज्ञान मिळवून ते अंमलात आणावे लागेल. प्रत्येक गोष्टीसाठी सरकारच्या तोंडाकडे पाहू नये, असा सल्ला लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी रविवारी येथे दिला.

येथील राजमाता अहिल्यादेवी फाऊंडेशनच्या वतीने येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित अहिल्यादेवी स्त्री शक्ती राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळयात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला खासदार आनंदराव अडसूळ, राज्यसभा सदस्य डॉ. विकास महात्मे, पालकमंत्री प्रवीण पोटे, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे उपस्थित होत्या.

सुमित्रा महाजन म्हणाल्या, शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर प्रत्येक विधवा शेतकरी महिलेने मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी उचलली आहे. ती कणखरपणाने परिस्थितीशी मुकाबला करताना दिसत आहे. आत्महत्येचा विचार मनात आणणाऱ्या शेतकऱ्यांना आता तुम्ही चुकीच्या मार्गाने जात आहात, हे सांगण्याची वेळ आली आहे. अन्नदात्याने हताश होऊन चालणार नाही. शेतमालाच्या भावावरून सरकारची नेहमीच कोंडी होते. भाव मिळाले नाही, तर शेतकऱ्यांचा रोष आणि महाग झाले, तर सर्वसामान्यांची आरडाओरड सुरू होते. भाव मिळावा म्हणून रस्त्यावर दूध सांडवणारा, भाज्या फेकून देणारा अन्नदाता असू शकेल का, हाही विचार करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी आता प्रक्रिया उद्योगांची कास धरून परिस्थितीशी सामना करणे शिकले पाहिजे.

सुमित्रा महाजन यांनी स्त्री शक्ती पुरस्कार मिळवणाऱ्या महिलांचा त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानाचा उल्लेख केला. आपल्या कर्तृत्वाने या मानिनींनी लढाई जिंकली आहे. लोकमाता अहिल्यादेवींच्या नावाने दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारतच पुण्याईचा भाव आहे, असे त्या म्हणाल्या. या कार्यक्रमात अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर, महिला गुप्तहेर रजनी पंडित, योगपटू प्रज्ञा पाटील, उद्योजिका कल्पना दिवे यांना सुमित्रा महाजन यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कारप्राप्त माजी राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाहीत.

यावेळी आनंदराव अडसूळ, डॉ. विकास महात्मे, पद्मिनी कोल्हापुरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रतीक्षा लोणकर, रजनी पंडित, प्रज्ञा पाटील, कल्पना दिवे यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष महात्मे यांनी केले. संचालन क्षीप्रा मानकर यांनी केले.

जबाबदारीची जाणीव महत्त्वाची – प्रतीक्षा लोणकर

पुरस्कार हे आनंद मिळवून देणारे असतात. ग्लॅमरच्या जगतात अनेक पुरस्कार मिळतात. पण, आपुलकीच्या भावनेतून दिल्या गेलेल्या या पुरस्काराचे महत्त्व आगळे-वेगळे आहे. हा माझ्या माहेरकडून झालेला सत्कार आहे. आनंदासोबतच आता जबाबदारीची जाणीवही महत्त्वाची वाटते. आपल्याला लोकांसाठी काम करायचे आहे, ही ती भावना आहे, असे अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांनी सांगितले. तब्बल तीन चाललेल्या या पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणाऱ्या ध्वनीचित्रफितींनी वेगळाच रंग भरला. ज्या कर्तृत्ववान महिलांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यांच्याविषयी देखील चित्रफितींच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. पुरस्कार सोहळ्याला अमरावतीकरांनी मोठी गर्दी केली होती.