उन्हाळ्याच्या सुट्टय़ांचा आनंद लुटण्यासाठी मुंबई, पुण्यातील पर्यटकांनी रायगडला पसंती दिली आहे. जिल्ह्यतील अलिबाग, आक्षी, नागाव, किहीम, काशिद, मुरुड, दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन, माथेरान या पर्यटन केंद्रावर पर्यटक मोठय़ा संख्येने दाखल होण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे बहुतांश पर्यटन स्थळांवरील किनारे पर्यटकांनी गजबजल्याचे पाहायला मिळते आहे.

विस्तीर्ण व स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी – पोफळींच्या बागा, हिरवी वनराई, गड किल्ले, लेण्या यांचे पर्यटकांना नेहमिच अप्रुप राहिले आहे. त्यामुळे अलिकडच्या काळात गोव्या पाठोपाठ कोकणही पर्यटकांसाठी फेव्हरेट डेस्टिनेशन बनत आहे. शाळांना सुट्टय़ा लागल्याने राज्यभरातील विविध भागातून पर्यटकांचा ओघ कोकणच्या दिशेने होण्यास सरूवात झाली आहे. रायगड जिल्ह्यतील समुद्र किनारेही सध्या पर्यटकांनी गजबजले असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

रायगड जिल्ह्यतील समुद्रकिनारे पर्यटकांना नेहमी भुरळ घालत असतात. अशातच मुंबई, पुणे, ठाणे आणि नवी मुंबई येथून तीन ते चार तासांत रायगड जिल्ह्यतील पर्यटनकेंद्रावर पोहोचणे सहज शक्य असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे.

मांडवा, आवास, किहिम, वरसोली, अलिबाग, आक्षी, नागांव,काशिद, मुरुड, दिवेआगार, श्रीवर्धन, हरिहरेश्वरचे किनारे सध्या हजारो पर्यटकांनी गजबजून गेले आहेत. तर थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या माथेरानमध्येही देशीविदेशी पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. त्यामुळे या परिसरातील हॉटेल व्यावसायिक, कॉटेजेस यांचा व्यवसाय सध्या तेजीत आहे.

गेल्या दोन दिवसांत अलिबाग  पिरसरात १५ ते २०  हजार पर्यटकांनी भेट दिली आहे. तर मुरुड आणि नागाव परिसरातही जवळपास  ७ ते ८ हजार पर्यटकांनी हजेरी लावली आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले माथेरान पर्यटकांनी गजबजले आहे. त्यामुळे जिल्ह्यतील पर्यटन उद्योगाला सुगीचे दिवस आल्याचे चित्र सध्या अनुभवायला मिळते आहे.

महामार्गावर वाहतुक कोंडी

महामार्गावरील वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने, मुंबई- गोवा महामार्ग आणि मुंबई -पुणे दृतगती मार्गावर वाहतुक कोलमडली आहे.

खारपाडा ते वडखळ आणि वाकण फाटा ते कोलाड नाका आणि इंदापुर ते माणगाव परिसरात सलग दोन दिवस वाहतुक कोंडी झाल्याचे दिसून आले. तर मुंबई -पुणे मार्गावर खोपोली ते लोणावळा परिसरात वाहतुकीचा वेग मंदावला होता.

मुंबई – मांडवा बोटसेवेतून क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतुक

प्रवाश्यांच्या संख्येत वाढ झाल्याने मुंबई ते मांडवा दरम्यान चालणारी जलवाहतुक सेवा हाऊस फुल झाली होती. मालदार आणि अंजठा कंपनीच्या बोटींमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाश्यांची वाहतुक सुरु होती. प्रवाश्यांच्या जिवाशी खेळ करून बोट चालक बिनबोभाटपणे जादा प्रवासी वाहतुक करत होते.

मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असता, बोट चालकांना सुचना देऊनही ते जादा प्रवासी वाहतुक करत असल्याचे सांगीतले.