तालुक्यातील हमरापूर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील वैतरणा नदीकाठी असलेल्या  करंजपाडा येथील २० वर्षांपूर्वी नदीला आलेल्या महापुरात खंडित झाला होता. तो पूर्ववत न झाल्याने यंदाही शेतकऱ्यांना उन्हाळ्यात करण्यात येणारी फुलशेती तसेच भाजीपाला ही पिके घेता येणार नाही. महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे येथील २५ हून अधिक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसणार आहे.

सन १९९८ साली देहर्जे व वैतरणा नदीला महापूर आल्याने या भागातील विजेचे खांब अस्ताव्यस्त पडले आहेत, काही ठिकाणी तर विजेच्या ताराही पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. पावसाळ्यानंतर येथील शेतकऱ्यांनी अनेकदा महावितरण कंपनीकडे विद्युत खांब नव्याने टाकून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती. मात्र गेली २० वर्षे शेतकऱ्यांच्या या मागणीकडे  महावितरण कंपनीने दुर्लक्ष केले आहे.

वीज पुरवठा खंडित झाल्याने येथील शेतकऱ्यांना शेतीपंपाद्वारे भाजीपाला लागवड, फळ व फुलशेती करता येत नसल्याने ते हवालदिल झाले आहेत.  स्वत:ची शेती असूनही या शेतीमध्ये उन्हाळी पिके घेता येत नसल्याने येथील शेतकऱ्यांना दुसऱ्यांच्या शेतीवर मजुरी करण्याची वेळ आली आहे.

करंजपाडा येथील पांडुरंग भोईर, श्रीधर सांबरे, मधुकर सांबरे, शांताराम ठाकरे, गोविंद सवरा आदी २५ अधिक आदिवासी शेतकऱ्यांवर ही वेळ आलेली आहे. येथील लोकप्रतिनिधीही न्याय देऊ शकत नसल्याने हे सर्व शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.

महापूरात विजेचे खांब उन्मळून पडून विद्युत पुरवठा खंडित झाल्याच्या घटनेला २० वर्षे झाली, वारंवार तक्रारी करुनही दखल घेतली जात नाही.

-श्रीधर सांबरे, शेतकरी, करंजपाडा, ता.वाडा.

करंजपाडय़ातील तक्रार महावितरण कार्यालयाकडे आलेलीच नाही. तक्रार आल्यास त्यावर कार्यवाही करण्यांत येईल.

-ज्ञानेश्वर वट्टमवार, विभागीय अभियंता, महावितरण उपविभाग, वाडा.