शेतकरी ज्या आश्वासक पावसासाठी नक्षत्राच्या आगमनाकडे डोळे लावतात तो ‘मृग’ तोंडावर असताना वातावरणातला उष्मा मात्र अजूनही वाढतच आहे. शुक्रवारी उन्हाचा पारा ४३.२ अंशावर गेला होता. या आठवडय़ात उन्हाची तीव्रता कमालीची वाढली आहे. आणखी ४ दिवस पारा असाच कायम राहण्याची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील वेधशाळेने वर्तविली. मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागली असताना उन्हाचा पारा मात्र दिवसेंदिवस तीव्र होत आहे. दरवर्षी ५ जूनच्या आसपास मान्सून कोकणात दाखल होतो. या वर्षी हवामान खात्याने ५ ते ७ जून दरम्यान मान्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तविला. मात्र, अजून तरी मान्सूनचे आगमन झाले नाही. उलट जूनचा पहिला आठवडा संपत आला, तरी तापमानात घट झाली नाही. मे महिन्यातील तीव्रतेचे ऊन अजूनही कायम असून तापमान ४३ अंशाच्या पुढेच आहे.
रविवारी (दि. ८) मृग नक्षत्र सुरू होत असून दरवर्षी या नक्षत्राची चाहूल थंडगार वाऱ्याने व पावसाच्या सरीने लागते. मृग नक्षत्राची चाहूल लागताच उन्हाळा गायब होतो. सकाळी अकरापासूनच कडक ऊन पडते. सायंकाळी उशिरापर्यंत उन्हाच्या झळा असतात. परिणामी अजूनही मे सुरू आहे का, असे वातावरण आहे. जूनच्या पहिल्या आठवडय़ात पिकांच्या पेरणीची अंतिम तयारी केली जाते. पावसाळी ढगांची छाया असलेल्या वातावरणात पेरणीच्या कामाला वेग येतो. यंदा मात्र कडक उन्हामुळे या कामात व्यत्यय येत आहे. दुपारी घराबाहेर पडणेही शक्य होत नसल्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट जाणवतो. शेतकरी दुपापर्यंत शेतातील कामे आटोपून विसावा घेत आहेत. शहरातही दुपारी घराबाहेर पडण्याचे नागरिक टाळत आहेत. शुक्रवारी तापमानाने कहर केला. बाजारपेठेसह मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट जाणवला. भारनियमन सुरू असलेल्या भागात लोकांचे हाल होत आहेत. आणखी ४ दिवस पाऊस पडण्याची शक्यता नसून उन्हाचा पारा असाच कायम राहील, अशी माहिती वेधशाळेतून देण्यात आली.