धुळे शहरासह जिल्ह्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असून शिरपूर तालुक्यात या उन्हाच्या कडाक्याने एका महिलेचा बळी गेला आहे. शिरपूर तालुक्यातील बाभुळदे येथील माजी सरपंच मालतीबाई शेनपडू निकुंभे (वय ४९) यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.२९) दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली. धुळे शहरात गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. मार्च महिन्यातच तापमानाचा पारा ४३ अंशांवर गेल्यामुळे नागरिकांना दुपारच्यावेळी घराबाहेर पडणे देखील कठीण होत आहे. परिणामी जिल्ह्यातील रस्त्यांवर दुपार दरम्यान शुकशुकाट दिसून येतो. गेल्या वर्षी २८ मार्चला ४१.० इतके कमाल तापमान नोंदवण्यात आले. यंदा मात्र २८ मार्चला ४३.४ अंश सेल्सियस ऐवढे तापमान नोंदवले गेले. ४४ अंशापर्यंत तापमान वाढल्यानंतर याचे तीव्र परिणाम येथील जनजीवनावर होतांना दिसून येत आहे. येथील माजी सरपंच महिला मालतीबाई निकुंभे यांना ताप असल्यामुळे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तेथे उपचार घेतल्यानंतर पुढील उपचारासाठी धुळे येथे रुग्णालयात नेत असतांना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. जिल्ह्यासह तालुक्यात उष्माघाताच्या त्या पहिल्या बळी ठरल्या आहेत.  जिल्ह्यातील अचानक वाढलेल्या या तापमानामुळे येथील जनजीवन प्रभावित झाले आहे. त्याचवेळी हवामान विभागाने येत्या दोन दिवसात तीव्र उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविली असून यामुळे नागरिकांना खबरदारी बाळगावी लागणार आहे. महत्वाचे काम असेल तरच उन्हात बाहेर पडावे अन्यथा घरात किंवा सावलीच्या जागी थांबावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. उष्णतेच्या लाटेचे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी विविध उपाययोजना कराव्यात. तसेच या कालावधीत जिल्हा नियंत्रण कक्ष, मनपा नियंत्रण कक्ष, विभागीय स्तरावरील नियंत्रण कक्ष व स्थानिक संस्था आणि आरोग्य विभाग यांनी एकत्रितपणे कार्य करावे. सर्व संबंधित विभाग, स्थानिक नेते व सामाजिक संस्था यांनीही या कार्यात सामील व्हावे. असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी केले आहे.