सोलापूर जिल्ह्य़ात मागील २६ फेब्रुवारीनंतर दहा-बारा दिवस गारपीट व वादळी वाऱ्यांसह पडलेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला होता. हिवाळ्यात अनुभवावे तसे तापमान खाली आले होते. परंतु गेल्या चार-पाच दिवसांपासून वातावरणात बदल होऊन तापमान वाढू लागले तसे उष्म्याचा त्रास सोलापूरकरांना सहन करावा लागत आहे. गेल्या पाच दिवसांत सोलापूरचे तापमान ३७.८ अंश सेल्सियसपर्यंत वाढल्याचे दिसून येते.
तापमानामुळे वातावरणातील शुष्कता वाढली असून रात्री हवा खेळती न राहता कोरडी असल्यामुळे आतापासून उन्हाळ्यात अंगाची लाही लाही होऊ लागली आहे. सकाळी नऊपासून ऊन तापायला सुरुवात होऊन दुपारी रणरणत्या उन्हात घराबाहेर अथवा कार्यालयाबाहेर पडणे असह्य़ होऊ लागले आहे. भर उन्हात फिरणे टाळले जात असल्यामुनळे दुपारच्यावेळी रस्त्यावरील वाहतूक रोडावल्याचे दिसून येते. वाढत्या उन्हाची चाहूल लागल्यामुळे रस्त्यावर काही स्वयंसेवी संस्था व संघटनांनी थंडगार पाणपोईची सेवा सुरू केली असून या पाणपोईचा लाभ सामान्य श्रमिक, पादचारी घेत आपली तृष्णा भागविताना दिसून येतात. लिंबू सरबत, लस्सी, मठ्ठा या पारंपरिक थंडपेयांसोबत अन्य ब्रॅन्डेड थंडपेयांचा आधार घेतला जात आहे, तर उन्हाळा सुसह्य़ करण्यासाठी सायंकाळी उद्यानांमध्ये गर्दी होऊ लागली आहे.