इंदुरीकर महाराजांना कोर्टाने समन्स बजावलं आहे. त्यानुसार त्यांना ७ ऑगस्टला कोर्टात हजेरी लावावी लागणार आहे. प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज अर्थात निवृत्ती महाराज देशमुख यांनी त्यांच्या किर्तनात एक दावा केला होता जो त्यांना चांगलाच भोवला आहे. संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवर संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला होताच. आता कोर्टाने त्यांना समन्सही बजावलं आहे.

चार महिन्यांपूर्वी हा वाद उद्भवला होता.. काय होता तो वाद हे जाणून घ्या या व्हिडीओच्या माध्यमातून

काय आहे प्रकरण?
‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. इंदुरीकर यांच्या किर्तनाचा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडिओ इतर सोशल माध्यमांवरही चांगलाच गाजला होता. त्यावरून त्यांच्यावर अनेकांनी टीकाही केली होती.

१७ फेब्रुवारी रोजी या संदर्भातली माहिती समोर आली होती. इंदुरीकर महाराजांची एक व्हिडीओ क्लीप व्हायरल झाली. ज्यात ते म्हणतात.. “सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते” या वक्तव्यावरुन फेब्रुवारी महिन्यात मोठा वाद झाला होता.

इंदुरीकर यांनी PCPNDT कायद्याच्या कलाम २२ चं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. त्यानुसार अहमदनगर येथील PCPNDT च्या सल्लागार समितीच्या सदस्यांनी त्यांना नोटीसही पाठवली होती. त्या नोटीशीला इंदुरीकर महाराज यांनी आपल्या वकिलांमार्फत बाजू मांडत उत्तर दिलं होतं. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या रंजना गावंदे यांनी नोटीस दिली हाती. त्यामध्ये प्रशासनाने गुन्हा दाखल न केल्यास तुम्हालाही दोषी धरण्यात येईल, असंही म्हटले होते. त्यानंतर इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झाला. आता त्यांना कोर्टाने समन्स बजावलं असून ७ ऑगस्ट रोजी या प्रकरणी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आता कोर्टात इंदुरीकर महाराज नेमकी काय बाजू मांडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.