21 January 2018

News Flash

तटकरे यांच्या कन्येला अध्यक्षपद

रायगडमध्ये संख्याबळ जास्त असूनही शेकापला उपाध्यक्षपद

अलिबाग, प्रतिनिधी | Updated: March 21, 2017 12:59 AM

रायगडमध्ये संख्याबळ जास्त असूनही शेकापला उपाध्यक्षपद

रायगड जिल्हा परिषदेत शेतकरी कामगार पक्षाला सर्वाधिक जागा मिळूनही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कन्येला अध्यक्षपद मिळावे हा मुद्दा प्रतिष्ठेचा केल्याने अखेर शेकापने राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना हे पद देण्याचे मान्य केले. आगामी लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत आदिती ही उमेदवार असू शकते.

५९ सदस्यीय रायगड जिल्हा परिषदेत शेकापचे २३ तर राष्ट्रवादीचे १२ सदस्य निवडून आले आहेत. अध्यक्षपद महिला गटासाठी राखीव असले तरी शेकापकडे महिला गटातील उमेदवार होत्या. पण कन्येला अध्यक्षपद मिळावे ही तटकरे यांची इच्छा होती. स्वत: तटकरे हे १९९२ मध्ये तरुणपणातच रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. पुढे आमदार, मंत्रिपद अशी त्यांची राजकीय वाटचाल झाली. कन्या आदिती हिलाही राजकारणात पुढे आणण्याची तटकरे यांची योजना आहे. यामुळेच कमी जागा मिळूनही अध्यक्षपद आदिती हिला मिळावे म्हणून तटकरे यांनी शेकापचे भाई जयंत पाटील यांच्याकडे शब्द टाकला. शेकापने तटकरेंची मागणी मान्य केली. पनवेल येथील कर्नाळा भवन येथे झालेल्या शेकाप आणि राष्ट्रवादीच्या संयुक्त बठकीत आदिती तटकरे यांना अध्यक्षपद तर उपाध्यक्षपदी आस्वाद पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे कार्यालयीन चिटणीस अ‍ॅड. परेश देशमुख यांनी दिली.

शेकापच्या जास्त जागा निवडून आल्याने अध्यक्षपदावर शेकापचा उमेदवार असावा असा सूर शेकापच्या सदस्याकडून लावला जात होता. मात्र, निवडणूकपूर्व आघाडीच्या निकषानुसार अध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच राहील असा निर्णय या बठकीत घेण्यात आला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदावर विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला. या निर्णयामुळे शेकापच्या नीलिमा पाटील, चित्रा पाटील आणि शुश्रूषा पाटील यांच्या पदरी निराशा आली आहे.

रोहा तालुक्याला अध्यक्ष, उपाध्यक्षपद

रायगड जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्षपदी आणि उपाध्यक्षपदाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी रोहा तालुक्याला मिळणार आहे. वरसे मतदारसंघातून विजयी झालेल्या आदिती तटकरे यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आले आहे. तर याच तालुक्यातील खारगाव मतदारसंघातून निवडून आलेले शेकापचे आस्वाद पाटील उपाध्यक्षपदाचे उमेदवार असणार आहेत.

आदिती तटकरे यांची राजकीय वाटचाल

आदिती या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत. युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण संघटक म्हणून त्या कार्यरत आहेत. सुनील तटकरे श्रीवर्धन मतदारसंघाचे आमदार असताना आदिती यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि शिवसेनेचा पारंपरीक मतदारसंघ असणाऱ्या श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादीची पाळेमुळे रुजवण्याचे काम केले. आमदार निधी आणि तसेच वेगवेगळ्या योजनांमधून श्रीवर्धन मतदारसंघासाठी आणलेला निधी योग्य प्रकारे विनियोग होतो की नाही हे पाहण्याचे काम त्यांनी या काळात केले. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद यंदा महिलांसाठी राखीव असल्याने त्यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या रोहा तालुक्यातील वरसे मतदारसंघातून त्या विक्रमी मतांनी निवडून आल्या आहेत.

रायगड जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची उमेदवारी आस्वाद पाटील यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ते रोहा तालुक्यातील खारगाव मतदारसंघातून निवडून आले आहेत. म्हणजेच अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद एकाच तालुक्याला मिळणार आहे.

First Published on March 21, 2017 12:58 am

Web Title: sunil tatkare aditi tatkare ncp shetkari kamgar party
  1. No Comments.