घरातील वादामुळे रायगडमध्ये पाया भक्कम करण्याचे प्रयत्न अपयशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तटकरे कुटुंबीयांमधील वाद मिटला, असे जाहीर करण्यात आले असले तरी तटकरे यांचे पुत्र अनिकेत आणि कन्या जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती हे अधिक सक्रिय झाले असून, बंधू आमदार अनिल आणि पुतणे आमदार अवधूत तुलनेत अलिप्त राहात असल्याने तटकरे कुटुंबीयांमध्ये सारे काही आलबेल नाही हाच संदेश समोर येतो. त्यातच पुढील वर्षी अनिल तटकरे यांच्या आमदारकीची मुदत संपत असल्याने त्यांना पुन्हा संधी मिळणार का, अशी चर्चा जिल्ह्य़ात आतापासूनच सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या राजकीय कारकीर्दीस ३० वर्षे पूर्ण होत असल्याने येत्या सोमवारी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. रायगडमध्ये आपला पाया भरभक्कम करण्याचा तटकरे यांचा प्रयत्न असला तरी घरातील वादाचा त्यांना फटका बसला आहे. वडिलांकडून राजकारणाचा वारसा मिळालेल्या सुनील तटकरे यांनी १९९२ मध्ये तरुण वयात जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले होते. माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी तटकरे यांना तेव्हा संधी दिली होती. तटकरे यांनी आपली कन्या आदिती यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी तरुण वयातच संधी दिली.

गेल्या वर्षी नगरपालिका निवडणुकीत तटकरे यांच्या घरातील वाद चव्हाटय़ावर आला. बंधू आमदार अनिल तटकरे यांनी सुनील तटकरे यांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला. या वादात सुनील तटकरे यांनी बाजी मारली. मग राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत तटकरे यांच्या कुटुंबीयातील वाद संपला, असे जाहीर करण्यात आले. भाऊ व पुतण्याचा वाईट अनुभव आल्याने सुनील तटकरे यांनी पुत्र अनिकेत आणि कन्या आदिती यांचे नेतृत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शेकापला जास्त जागा मिळूनही आघाडीत जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कन्या आदिती यांच्यासाठी तटकरे यांनी पदरात पाडून घेतले.

पुढील वर्षी सुनील तटकरे आणि अनिल तटकरे या दोन्ही भावांची विधान परिषदेची मुदत संपत आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे प्रतिनिधित्व अनिल तटकरे हे करतात. अनिल तटकरे यांना दोनदा सुनील तटकरे यांनी निवडून आणले. यावेळी स्वत: सुनील तटकरेच ही निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तविली जाते.

आपल्या ३० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत सुनील तटकरे यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, विधान परिषद अशा विविध पातळ्यांवर या वाटचालीत काम केले आहे. जिल्हा परिषदेचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून त्यावेळी ते ओळखले गेले. राज्याच्या मंत्रिमंडळात अन्न नागरी पुरवठा, जलसंपदा, अर्थ व नियोजन यासारख्या हाय प्रोफाईल विभागांचा कार्यभार त्यांनी संभाळला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा अपवाद सोडला तर ते कधी अपयशी ठरले नाहीत.

जलसंपदा मंत्रिपदाची कारकीर्द त्यांच्यासाठी काटेरी ठरली. जलसंपदा विभागाच्या घोटाळ्यात त्यांच्यावर आरोप केले गेले. रायगड जिल्ह्यातील कोंढाणे आणि बाळगंगा धरणांच्या कामात प्रशासकीय अनियमितता करून धरणांच्या किमती करोडो रुपयांनी वाढवल्याचा आरोप त्यांच्यावर झाला.

तटकरे यांची राजकीय कारकीर्द ही लक्षवेधी आणि तितकीच वादग्रस्त राहिली आहे. ३० वर्षांच्या राजकीय वाटचालीत त्यांनी अनेक चढउतार पाहिले आहेत. आरोप-प्रत्यारोपांना त्यांना सामोर जावे लागले आहे. या परिस्थितीतही त्यांनी पवार घराण्याशी असलेली निष्ठा ढळू दिलेली नाही. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दाखवलेला संयम हा त्यांच्या प्रगल्भपणाची साक्ष देतो. प्रशासनावर असलेली घट्ट पकड ही त्यांची जमेची बाजू आहे. वेळ पडलीच तर शेकापसारख्या कट्टर विरोधकांशी जुळवून घेण्याची त्यांची तयारी असते. त्यामुळेच कोकणातील इतर राजकीय नेत्यांच्या तुलनेत ते उजवे ठरतात यात शंका नाही.

पुत्र आणि कन्या सक्रिय

घरातील वाद मिटले, असे चित्र निर्माण करण्यात आले असले तरी आजही अवधूत तटकरे आणि अनिल तटकरे जिल्ह्यातील राजकारणात सक्रिय दिसत नाहीत. दुसरीकडे अवधूत तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदार संघात सघटनात्मक बांधणीची जबाबदारी सुनील तटकरे यांनी आता मुलगा अनिकेत तटकरे याच्यावर सोपवल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे या देखील श्रीवर्धन मतदारसंघात सातत्याने सक्रिय आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या मतदार संघात काम करण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे. या सर्व परिस्थितीत अवधूत तटकरे यांनी मतदारसंघापासून अलिप्त राहणे पसंत केले आहे. त्यामुळे तटकरे कुटुंबातील वाद मिटले असले तरी मनोमीलन झाले की नाही याबाबत साशंकता आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil tatkare family dispute solved
First published on: 07-10-2017 at 04:21 IST