राज्यातील फडणवीस सरकार दिखाव्यासाठी स्थिर आहे, मात्र रोजच अस्थिर आहे. असा मार्मिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी लगावला आहे. सर्वाधिक संख्याबळ असूनही दुर्बल सरकार असल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली. ते पंढरपूर येथे बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे शनिवारी पंढरपूर येथे आले होते. येथील विश्रामगृह येथे पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला. या वेळी ते बोलत होते. पुढे बोलताना तटकरे म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासात १९८० सालानंतर सर्वाधिक संख्याबळ  आहे. मात्र हे दिखाव्यासाठी स्थिर सरकार आहे, मात्र भाजप आणि शिवसेना यांच्यातील वारंवार होणारी धुसफुस पाहता सदरचे सरकार हे दररोज अस्थिर असल्याचे दिसून येत असल्याचेही ते या वेळी म्हणाले. शिवसेना सरकारमध्ये कितपत टिकेल अशा विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी स्थिर-अस्थिरतेचे विधान केले आहे.

सध्या केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी वेळकाढूपणा करीत आहे. अशा परिस्थितीमध्ये सध्या सरकारने राष्ट्रीयीकृत बँकांकडून निदान खरिपाच्या पिकांसाठी तरी कर्जे वाटप करावीत, असा सल्ला या वेळी तटकरे यांनी सरकारला केला आहे. बीडीडीच्या पुनर्विकास हा आघाडी सरकारच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे रखडल्यांचा आरोप मुख्यमंत्री करीत आहेत. यापेक्षा हाती घेतलेली कामे मुख्यमंत्र्यांनी करावीत.चाळीतील रहिवाशांना सध्या देत असलेल्या चौरस मीटरपेक्षा अधिक जागा हवी आहे. या रहिवाशांमध्ये नाराजी असल्याचे तटकरे यांनी सांगितले आहे.

नागपूरच्या आमदार निवासात झालेले बलात्कार प्रकरण हे धक्कादायक असून, अशा प्रकारे कुणाला खोली दिली जातेय याची पडताळणी करावी. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी तटकरे यांनी केली. नागपूर शहर हे गुन्हे क्षेत्राची राजधानी होत असल्याचेही ते या वेळी  म्हणाले आहेत. केंद्र सरकारने लाल दिवा बंदी केली. सदरचा निर्णय हा सवंग लोकप्रियतेसाठी असून, राज्यातील महत्त्वाचे प्रश्न सोडवून इतर गोष्टीला सरकार प्राधान्य देत असल्याची टीकाही त्यांनी केली.